Pune News : पुण्यात उद्या राज्यस्तरीय युवा संसद, 34 जिल्ह्यातील 68 स्पर्धकांचा सहभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन केले आहे. येत्या 13 जानेवारीला संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात ही स्पर्धा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या अभियानाची राज्य पातळीवरील स्पर्धा सोमवारी (दि.4) नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स अँड इकॉनॉमिक्‍स येथे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यस्तरीय युवा संसदेत ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.

तरुणांनी सामाजिक प्रश्न जाणून त्यांचा सखोल अभ्यास करावा, त्यांच्या वक्‍तृत्त्व कौशल्यात भर पडावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जात आहे. स्पर्धेत राज्यातील एकूण 34 जिल्ह्यातून जिल्हास्तरीय युवा संसदेतून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने विजयी ठरलेले असे एकूण 68 स्पर्धक सहभागी होणार आहेत.

राज्यस्तरीय युवा संसदेत प्रथम आलेल्या स्पर्धकास संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदेत प्रत्यक्ष बोलण्याची तर, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास राष्ट्रीय युवा संसदेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय पातळीवर विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे दोन लाख, दीड लाख आणि एक लाख रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. नेहरू युवा केंद्र संघटनचे राज्य संचालक पी. पी. हिंगे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय युवा संसदेचे आयोजन केल्याचे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी सांगितले.