‘त्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला होता का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या टिकेला प्रत्त्युत्तर देत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केला आहे. गुजरातमधील अधिकाऱ्यांनी जेव्हा तेथील मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवर आरोप केले होते, तेव्हा भाजपने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला होता का? असा थेट प्रश्न नवाब मलिक यांनी केला आहे.

रवीशंकर प्रसाद यांच्या टिकेला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘रवीशंकर प्रसाद यांनी लोकांना शिकवू नये. भाजप हाय मोरॅलिटीच्या गप्पा मारतो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन सरकारच्या कामाची रिपोर्टींग करतो. संघाची कोणती व्यक्ती घटनात्मक पदावर आहे? त्यांना रिपोर्टिंग करणं ही कोणती मोरॅलिटी आहे? ही कोणती घटनात्मक प्रोसेस आहे, असा थेट प्रश्न नवाब मलिक यांनी केला. नैतिकतेवरच बोलायचं असेल तर भाजपवाल्यांनी आधी भूतकाळ आठवावा. असे ते म्हणाले.

 

 

 

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची पक्षांतर्गत चौकशी केली जाणार आहे. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे राजीनाम्याची मागणी केली जात नाही, पण केवळ त्या आधारे राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

मंत्री रवीशंकर प्रसाद काय म्हणाले होते?

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिलं आहे. मग इतर मंत्र्यांना सरकारने किती वसुली करण्याचे टार्गेट दिलं आहे? उद्धव ठाकरे व शरद पवार गप्प का आहेत,’ अशी टीका मंत्री रवीशंकर प्रसाद केला होता.