PM मोदी आणि CM योगींच्या भाजप सरकारनं ‘बाबरी मशिदी’च्या निर्माणासाठी देखील ट्रस्ट बनवुन आर्थिक मदत द्यावी : शरद पवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणून भाजपाच्या विरोधात रणनीती आखण्यासंदर्भात बुधवारी लखनौला आलेले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारावर आरोप केला की हे लोकांना धर्मानुसार वाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले की, अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवून आर्थिक मदत दिली जात आहे, परंतु पाडलेली बाबरी मशीद बांधण्यासाठी सरकार कोणतीही मदत देत नाही. बाबरी मशिदीच्या बांधकामासाठी देखील ट्रस्ट बनवून मदत दिली पाहिजे.

राजधानी लखनौच्या रविंद्रालयमध्ये आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी परिषदेला संबोधित करताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी यूपी सरकारच्या अर्थसंकल्पावर चिमटा घेत म्हटले की, या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. बेरोजगारांना मासिक प्रशिक्षण भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे, परंतु त्यांना ते मिळू शकेल की नाही हे सांगणे कठीण आहे. ते म्हणाले की, तरुणांना परिश्रम करण्याचा हक्क पाहिजे, असे भत्ते देऊन काम होणार नाही. आज यूपी आणि देशभरातील शेतकरी आणि तरुणांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे देशात बदल घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बिगुल वाजवावे लागेल.

शरद पवार म्हणाले की, यूपीमधील बेरोजगारीमुळे मोठ्या संख्येने तरुणांना महाराष्ट्रासह इतर राज्यात जाण्यास भाग पाडले जात आहे. भाजपा सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळेच जनता आता त्यांना सत्तेतून बाहेर काढत आहे. दिल्लीत पंतप्रधान स्वतः त्यांच्याबरोबर प्रचार करण्यासाठी गेले, गृहमंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री देखील प्रचारासाठी गेले पण अरविंद केजरीवाल यांना जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिले. महाराष्ट्राप्रमाणेच यूपी व अन्य राज्यातील विरोधी पक्षांना एकत्र करून भाजपा सरकारला सत्तेतून बेदखल करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शरद पवार म्हणाले की, भाजपाचे लोकांमध्ये फूट पाडून राज्य करण्याचे धोरण आता लोकांना चांगलेच समजले आहे. त्यामुळे जनतेची आता त्यांच्याकडून दिशाभूल होऊ शकणार नाही. तसेच ते म्हणाले की सीएए आणि एनआरसी सदोष असून यामध्ये मुस्लिम अल्पसंख्याकांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले की, लोकांमध्ये फक्त द्वेष निर्माण केला जात आहे आणि विकास खूप मागे राहिला आहे. आमचा पक्ष सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावर सरकारविरूद्ध आहे. यूपीमधील राजकीय पक्षांमध्ये ऐक्य नसल्यामुळे भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. ते म्हणाले की, या राज्यस्तरीय परिषदेनंतर जिल्हास्तरीय परिषदा घेण्यात येतील. आम्ही यूपीमध्ये आमच्या पक्षाची स्थिती मजबूत करणार. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केके शर्मा यांनी उपस्थित जनतेचे आभार मानले.

You might also like