नवी दिल्ली : वृत्त संस्था – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनासाठी आणि विरोधात उत्तर पूर्व दिल्लीत सुरू असलेल्या हिंसेबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठे वक्तव्य केले आहे. गृह मंत्रालयाने शंका व्यक्त केली आहे की, ही हिंसा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्यामुळे सुरू करण्यात आली आहे. याद्वारे ठरवून ट्रम्प यांच्या समोर भारताची प्रतिमा खराब करण्याचा कट रचला गेला. गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलीस कमिश्नर घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि लवकरच स्थिती नियंत्रणात येईल.
केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किसन रेड्डी यांनी म्हटले की, उत्तर पूर्व दिल्लीतील हिंसा ही अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौर्यादरम्यान जाणीवपूर्वक सुरू करण्यात आली आहे. मी याचा निषेध करतो. सरकार अशा प्रकारची हिंसा कधीही सहन करणार नाही. यासाठी जे दोषी आहेत, त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. गृह मंत्रालय त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तेथे जादा पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. आमची मुख्य प्राथमिकता दिल्लीत कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवणे ही आहे. गृह मंत्रालयाने त्या लोकांवर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे, जे पोलीस कर्मचार्यांची हत्या, दगडफेक आणि संपत्तीची जाळपोळ करण्यासाठी दोषी आहेत.
त्यांनी म्हटले की, राहुल गांधी, काँग्रेस पार्टी आणि सीएएविरोधात आंदोलन करणार्या लोकांना सांगितले पाहिजे की, भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी कोण जबाबदार आहे?
उत्तर पूर्व दिल्लीतील हिंसेबाबत केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सांगितले की, ज्येष्ठ अधिकारी घटनास्थळावर आहेत. तेथे योग्य ती सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्थिती नियंत्रणात आहे.
अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्र्यांना केले आवाहन
जाफराबाद आणि मौजपुरमध्ये हिंसक प्रकार घडल्यानंतर दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, दिल्लीच्या एका भागातून शांतता आणि एकात्मतेचे नुकसान करणारे चिंताजनक वृत्त येत आहे. मी लेफ्टनन्ट गव्हर्नर आणि गृहमंत्र्यांना कायदा सुव्यवस्था सुरळती ठेवण्याचे आवाहन करतो. हिंसा करण्याची कुणालाही परवानगी नाही.
महिलांनी मेट्रो स्टेशनवर सुरू केले आंदोलन
जाफराबादमध्ये सीएएच्या विरोधात दिड महिन्यापासून रस्त्यावर तंबू ठोकून महिला आंदोलन करत आहेत. शनिवारी या महिलांनी जाफराबाद रोड बंद केला. रविवारी सकाळी पोलीस अधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मौजपुर ते सीलमपुरला जाणारा रस्ता खुला केला, परंतु सीलमपुर ते मौजपुरला जाणारा रस्ता बंद राहिला. यादरम्यान आंदोलनकर्त्यांनी जाफराबाद मेट्रो स्टेशनच्या खाली धरणे आंदोलन सुरू केले आहे.
रविवारी सीएएच्या समर्थकांचे आंदोलन आणि झाली दगडफेक
रविवारी दुपारी सुमारे तीन वाजता येथून सुमारे 500 मीटरवर भाजपा नेते कपिल मिश्र, कुसुम तोमर व अन्य समर्थकांसह मौजपुर लालबत्ती येथे सीएएच्या समर्थनासाठी धरणे धरले. यादरम्यान सुमारे 100 मीटरवर मौजपुर चौकात कबीर नगर आणि कर्दमपुरीमधून लोक एकत्र येऊ लागले. त्यांनी सीएएच्या विरोधात आझादीच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. यावेळी कपिल मिश्र यांच्या धरणे आंदोलनावर दगडफेक करण्यात आली. तेव्हा कपिल मिश्रा यांच्या समर्थनासाठी बाबरपुर – मौजपुर येथून लोक जमू लागले. बघता-बघता दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाला. यमुना पलिकडील अनेक भाग रविवारी दिवसभर धगधगत होते. यामध्ये जाफराबाद, मौजपुर, बाबरपुर, करावल नगर प्रमुख होते. येथे सीएए विरोधक आणि समर्थक आमने सामने आले होते. यामुळे येथे जोरदार दगडफेक आणि हिंसा झाली.
सोमवारीही हिंसा सुरूच
दिल्लीच्या विविध भागात सोमवारी आंदोलन सुरूच होते. जाफराबाद रोड, भजनपुरा आणि मौजपुरमध्ये हिंसक आंदोलनादरम्यान दोन घरांना आग लावलण्यात आली आणि पेट्रोल पंप जाळण्यात आला. हिंसेत पोलीस कर्मचारी रतन लाल यांचा मृत्यू झाला, तर डीसीपीसह अनेकजण जखमी झाले आहेत. मौजपुर हिंसेदरम्यान सुमारे 37 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. शाहदरा डीसीपी अमित शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. एसीपी गोकुलपुरी यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. हिंसक आंदोलनामुळे उत्तर-पूर्व जिल्ह्यातील 10 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला.