पहिल्या टप्प्यात ‘इतक्या’ दिवसांचा असू शकतो लॉकडाऊन; कॅबिनेटमध्ये चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यभरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, ही रुग्णसंख्या अपेक्षित अशी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुन्हा एकदा दिले आहेत. तसेच राज्यात लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध आणखी काही कालावधीसाठी वाढवावे लागणार आहेत, असेही ते म्हणाले.

राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. यादरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण आता संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विजय वडेट्टीवार यांच्यानंतर अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत, तरीही नागरिकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड मोठा ताण येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे ही रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात यावा, अशी आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

…मग पुढचा निर्णय

पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात यावा. पहिल्या टप्प्यातील परिणाम पाहून पुन्हा पुढील लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घ्यावा. तसेच आजच्या कॅबिनेट बैठकीत निश्चितच यासंदर्भात चर्चा होईल. त्यामुळे आता यावर नक्की काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल, असेही शिंगणे यांनी सांगितले.