राज्य प्रदूषण मंडळाचा महापालिकेला दणका ! बायोमायनिंग प्रकल्पात मिश्र कचर्‍यावरील प्रक्रिया थांबविण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देवाची उरूळी येथील कचरा डेपोमधील बायोमायनींग प्रकल्पामध्ये शहरातून गोळा केल्या जाणार्‍या मिक्स कचर्‍यावरील प्रक्रिया थांबवावी, असे आदेश राज्य प्रदूषण मंडळाने दिले आहेत. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आज महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार देवाची उरूळी येथील कचरा डेपोवर नव्याने कचरा डंपिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतू महापालिकेच्यावतीने नवीन कचरा प्रकल्पांची उभारणी होईपर्यंत डिसेंबर २०१९ पर्यंत कचरा डंपिंगची परवानगी मागितली होती, ती लवादाने दिली होती. परंतू यानंतर महापालिकेकडून प्रकल्प उभारणीस विलंब झाल्याने महापालिकेने कचरा डेपोच्या आवारात असलेल्या जुन्या कचर्‍यावरील प्रक्रिया प्रकल्प अर्थात बायोमायनिंग प्रकल्पावर शहरातील २५० ते ३०० टन कचर्‍यावर प्रक्रिया करणे सुरू ठेवले होते. ग्रामस्थांकडून यासाठी मे अखेरची मुदत मागण्यात आली होती. परंतू ही मुदत उलटल्यानंतरही पालिकेकडून याठिकाणी शहरातील कचरा प्रक्रियेसाठी आणण्यात येत आहे. या नवीन कचर्‍यातून निर्माण होणारे रिजेक्ट कचरा डेपोतच टाकण्यात येत आहे. त्यामुळे कचर्‍यापासून निर्माण होणार्‍या लिचेटचे प्रमाण वाढले असून यामुळे परिसरातील नाले व पाण्याचे स्त्रोत दुषित झाले आहेत. याचा थेट परिरणाम नागरीकांच्या आरोग्यावर होत असल्याने मिश्र कचर्‍यावरील प्रक्रिया बंद करावी, यासाठी ग्रामस्थांनी मागील काही दिवसांपासून आंदोलनही सुरू केले आहे. परंतू काल पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने आंदोलन मोडून काढताना आंदोलकांनाही ताब्यात घेतले होते. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी राज्य प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली.

राज्य प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी कचरा डेपोची व्हिजीट करून वस्तुस्थिती पाहीली. त्यावेळी बायोमायनींग प्रोजेक्टमध्ये शहरातून गोळा केल्या जाणार्‍या मिश्र कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील २०१६ च्या नियमानुसार बायोमायनिंग प्रकल्पामध्ये मिश्र कचर्‍यावर प्रक्रिया करण्यास परवानगी नाही. ही प्रक्रिया थांबवावी. तसेच याठिकाणी निर्माण होणारे लिचेट हे टँकरमध्ये गोळा करून जवळच्या एसटीपी प्लँन्टवर त्यावर प्रक्रिया करावी, असे आदेश महापालिकेच्या घनकचरा विभागाला दिले आहेत. तसेच पुढील तीन दिवसांत या पुर्ततेबाबत प्रदूषण मंडळाला अहवाल द्यावा, असेही या आदेशात नमूद केले आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने भगवान भाडळे, अनंता भाडळे, रणजित रासकर यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे केली आहे.