Hingoli News : SRPF जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला, घातपाताचा संशय

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य राखीव दलाच्या जवानाचा मृतदेह लोहगाव (ता. हिंगोली) शिवारातील एका विहीरीत संशयास्पदरित्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. 17) दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या डोक्यात जखमा असल्याने हा घातपात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

राजकुमार उत्तम पवार (वय-35 रा. होलगिरा,ता. सेनगाव) असे या मृत जवानाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत राजकुमार पवार हे हिंगोलीच्या राज्य राखीव दलात सन 2006 पासून कार्यरत होते. मंगळवारी रात्री ते जांभरून तांडा येथून हिंगोलीकडे येत होते. मात्र ते घरी परतले नसल्याने कुटुंबियांनी शोध सुरु केला. दरम्यान, बुधवारी दुपारी लोहगाव शिवारात एका विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत राजकुमारचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला. तपासणीत त्यांच्या डोक्यात जखमा दिसून येत असल्याने त्यांचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कुठल्याही गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान यासंदर्भात राज्य राखीव दल कार्यालयाशी संपर्क साधला असता जवान राजकुमार पवार हे 3 मार्चपासून 15 दिवसाच्या अर्जित रजेवर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार असल्याचेही राखीव दलाच्या सूत्रांनी सांगितले.