रामल्लाचे दर्शन व मंदिर निर्माण ‘राष्ट्रीय कर्तव्य’, ओवैसींनी सुद्धा यावे आयोध्येत : संजय राऊत

अयोध्या : वृत्तसंस्था – शिवसेना प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच नव्हे, तर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सारख्या नेत्यांनीसुद्धा अयोध्येत यावे आणि रामल्लाचे दर्शन करावे. त्यांचे म्हणणे आहे की, रामल्लाचे दर्शन आणि मंदिर निर्माण धार्मिक नव्हे, राष्ट्रीय कर्तव्य आहे.

शनिवारी रामनगरीत पोहचत असलेले शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आगमनाच्या तयारीला अंतिम रूप देण्यासाठी आलेल्या राऊत यांनी बायपास मार्ग येथील एका हॉटेलमध्ये मीडियाशी बातचीत केली. यावेळी त्यांना, शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या अयोध्येतील आगमनासोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही रामललाचे दर्शन घेण्यासाठी बोलावणार का, असा प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी सर्व भेदभाव विसरून देशातील सर्व लोकांनी आणि विरोधी पक्षांनी सुद्धा मंदिर निर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन केले. ते म्हणाले, रामल्ला सर्वांचे आहेत.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात आघाडीचे जे सरकार आहे, ते पूर्ण पाच वर्ष टिकणार आहे. जर उद्धव ठाकरे यांच्या भाषेत बोलायचे तर महाराष्ट्रात ही व्यवस्था आणि सरकार पूर्ण 15 वर्ष चालेल. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आगमनाला विरोध करणार्‍यांना फटकारताना म्हटले की, आम्हाला विरोध दिसत नाही, परंतु लोकशाही आहे आणि ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी करावा. नियोजित कार्यक्रमानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विशेष विमानाने पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासोबत शनिवारी दुपारी दोन वाजता लखनऊच्या एयरपोर्टवर उतरतील. तेथून रस्ते मार्गाने रामनगरीत पोहचतील. ते रामल्लाचे दर्शन 4:30 वाजता घेणार आहेत. यादरम्यान त्यांच्यासोबत पक्षाचे सुमारे 20 खासदार, महाराष्ट्रातील शिवसेनेचे मंत्री आणि आमदार तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी सुद्धा रामल्लाचे दर्शन घेतील. शिवसैनिकांना घेऊन येणारी ट्रेनसुद्धा शुक्रवारी सायंकाळी फैजाबाद रेल्वे स्टेशनवर पोहचली होती.