पुण्यात आजपासून महाराष्ट्र शासनाचा ‘लावणी’ महोत्सव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याजवळच्या वाघोली गावात बाजार मैदानावर महाराष्ट्र शासनाचा लावणी मोहत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक १४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत हा तमाशा मोहत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नामवंत तमाशा फडांना या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने आमंत्रित केले आहे. तर याच कार्यक्रमाच्या दरम्यान   ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कार’ बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना वितरित केला जाणार आहे.

‘व्हॅलेंटाईन-डे’ ला जन्मलेल्या मधुबालाला गुगलचा मुजरा 

तमाशा महोत्सवाचा मान प्रथमच वाघोली गावाला मिळाल्याने ग्रामस्थ कार्यक्रम भव्य दिव्य स्वरुपात साकार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कलाकारांच्या राहुट्या, भव्य मंच, स्वागत कमानी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. याच मंचावरून दिनांक १५ फेब्रुवारी रोजी  ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कार’ बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार २००५ पासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येतो. या वेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात मंगला बनसोडे, कांता सातारकर, मालती इनामदार आणि रघुवीर खेडकर या बड्या तमाशा कलाकारांचे तमाशा फड आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी पंचक्रोशीतील रसिकांची मोठी गर्दी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पायाभूत सुविधांची पूर्तता वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.