गणेशोत्सवापूर्वी महाराष्ट्र चूलमुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात ४५ लाख कुटुंबांकडे गॅस जोडणी नाही त्यांना गणेशोत्सवापूर्वी गॅस जोडणी देऊन महाराष्ट्र चुलमुक्त करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, चंद्रपूर चे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले की, ‘उज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रात ज्या लाभार्थ्यांना गॅस जोडणी देणे शक्य आहे. त्यांची यादी तयार करण्यात यावी. उर्वरित जे लाभार्थी उज्ज्वला योजनेत लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना गॅस जोडणी देण्यासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देईल. अन्न व नागरी पुरवठा विभागाने याचा सविस्तर अभ्यास करून लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा. त्यास मंजुरी दिली जाईल.’

चुलीच्या धुरापासून महिलांच्या डोळय़ांना होणारा त्रास थांबविण्यासाठी ‘उज्ज्वला योजना’ देशभर राबविली जात आहे.