पाकिस्तानला अभिनंदनला सोडावेच लागणार होते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना परत करणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केली. अभिनंदनच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर दबाव टाकण्यात भारत यशस्वी झाला आहे. भारताने जैश-ए-महंमदचा तळ उध्वस्त करुन जगाचा पाठिंबा मिळवला आहे, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

जैशचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यासाठीची मागणी इतर देशांनी देखील उचलून धरली आहे. अमेरिका, रशिया व इंग्लंड देशाने ही मागणी केली आहे. मात्र, चीनची भूमिका काय असेल हे बघणे महत्वाचे असल्याचेही निकम यांनी सांगितले. तसेच दोन्ही देशांकडे अणवस्त्र असल्याने युद्ध हे दोन्ही देशांना परवडणारे नाही. बुधवारीची इम्रान खान यांची भूमिका सामोपचाराची होती.

दहशतवाद्यांनी केलेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेला हवाई हल्ला अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. भारत कोणत्याही परिस्थीतीत दहशतवादाला पोसणार नाही, आमच्या सार्वभौमत्त्वावर घाला घालणाऱ्यांना भारतीय लष्कर चांगला धडा शिकवेल. तसेच जिनिव्हा करारानुसार सर्व नियमांचे पालन पाकला करावे लागेल व अभिनंदन यांना परत करावे लागेल, असेही निकम यांनी सांगितले.