नागरिकांच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांना निवेदन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी लासलगाव येथे घडलेल्या जळीतकांडामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी होणे गरजेचे आहे. तरच असल्या अघोरी व काळिमा फासणार्‍या घटनांना आळा बसेल, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे निफाड तालुका अध्यक्ष सुनील पोळ यांनी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.

या घडलेल्या घटनेमुळे लासलगाव आणि परिसरातील महिला व विद्यार्थी- पालक भयभीत झाले असून त्यांना असुरक्षित वाटत आहे. या परिसरातील वर्दळीचे ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, शाळा-कॉलेज या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज आहे. बेजबाबदार व उर्मट तरुणांच्या टोळक्यांचा बस स्टँड, कॉलेज रोड, सह्याद्री चौक, इत्यादि ठिकाणी नेहमीच वावर असल्यामुळे या परिसरातील महिलांना तसेच विद्यार्थिनींना असुरक्षित वाटत आहे.

सदर ठिकाणी पोलीस यंत्रणेमार्फत सुरक्षेसाठी योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचे आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी निफाड तालुका अध्यक्ष सुनील पोळ, मुख्य उपाध्यक्ष योगेश गलांडे, उपाध्यक्ष नवनाथ जिरे, मुख्य महासचिव विकास खुडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.