राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याला मोदींनी दिले असे उत्तर 

जामनगर : वृत्तसंस्था – राफेल असते तर आज दहशतवाद विरोधातील कारवाई अजून परिणामकारक झाली असती असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सडकून टीका केली होती. राफेल करारामध्ये भ्रष्टाचार झाल्यानेच राफेल विमाने भारतात यायला उशीर झाला आहे असे वक्तव्य राहुल यांनी केले होते. राहुल यांच्या या वक्तव्याचा मोदींनी आज समाचार घेतला आहे. गुजरातच्या जामनगर येथील सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी राहुल यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. राफेलबाबत बोलताना कृपया कॉमन सेन्सचा वापर करा अशा शब्दात मोदींनी खडेबोल सुनावले.

राहुल गांधींच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले की, “कृपया कॉमन सेन्सचा वापर करा; मी काय म्हणालो, एअर स्ट्राईकच्यावेळी जर आपल्याकडे राफेल असते तर आपल्या कोणत्याही फायटर जेटला खाली जाण्याची गरज भासली नसती आणि त्यांच्यातले कोणीही वाचू शकले नसते. मी म्हणालो राफेल वेळेत आले असते तर फरक पडला असता. ते म्हणतात की मोदी हवाई दलाच्या एअर स्ट्राईकवर शंका घेत आहेत.” असे म्हणत मोदींनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

दरम्यान राफेलच्या मुद्द्यावर वक्तव्य करताना राहुल गांधी यांनी मोदींवर अतिशय कठोर शब्दात टीका केली होती. तुम्हला खोटे बोलताना लाज वाटत नाही का ? असा प्रश्न त्यांना विचारला होता. राहुल गांधी म्हणाले होते की, “भारतीय जनतेच्या ३० हजार कोटी रुपयांची चोरी करुन अनिल अंबानींना दिले. या दिरंगाईला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. तुम्हाला शूर का म्हणायचे ? तुमच्यामुळे विंग कमांडर अभिनंदन सारखे भारतीय हवाई दलातील पायलट आऊट डेटेड विमाने चालवून आपला जीव धोक्यात घालत आहेत.”