पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन व्यापाऱ्यांमधील संयम संपला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना या लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीमुळे प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकार व प्रशासनाने सध्याच्या निर्बंधावर त्वरित विचार करून मध्यम मार्ग काढावा अन्यथा, व्यापाऱ्यांमधील संयम संपला असून ते कधीही दुकाने उघडतील, असा इशारा देतानाच व्यापाऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासाठी निवेदन दिले. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील व्यापारी या लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीमुळे अडचणीत आला आहे. कर्जाचे हप्ते, भाडे, वीज बिल, कामगारांचे पगार व इतर खर्च व्यापाऱ्यांनी कसे करायचे? असे अनेक प्रश्न गेल्या वर्षापासून असताना आता कुठे व्यापारी त्याचा व्यवसाय सुरू करत असतानाच निर्बंधांच्या नावाखाली लॉकडाऊन केला. व्यापारी या परिस्थितीत जगूच शकत नाही, असे निवंगुणे यांनी सांगितले आहे.

सरकारने व्यापाऱ्यांच्या परिस्थिती चा बारकाईने अभ्यास करावा. आणि दुकाने सुरू करण्याची मुभा द्यावी. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी व्यापारी घेतील. आणि नियमांचे पालन करून व्यवसाय करतील. परंतु, सरसकट बंद व्यापाऱ्यांना सहन होणार नाही. त्यांच्यातील सहनशीलता व संयम संपला आहे. विनाकारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये यासाठी सरकारने त्वरित निर्णय बदलावेत, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा असल्याचे निवंगुणे म्हणाले.