Flashback 2019 : क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झाले असे विक्रम ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१९ वर्ष क्रिकेटच्या बाबतीत अविस्मरणीय ठरले आहे. २०१९ मध्ये अनेक नवीन विक्रम झाले आहेत. कसोटी क्रिकेटचा विचार केला तर बहुतेक सामने हे अनिर्णितच रहायचे परंतु या वर्षात अनेक सामन्याचे निकाल लागले आहेत. खुप कमी सामने असे होते की जे ड्रॉ झाले. या वर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिका ही खूप रोमांचकारी ठरली आणि भारतीय संघाच्या कामगिरीने तर जगातील सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले. २०१९ मध्ये क्रिकेटमध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या की पहिल्यांदाच पहायला मिळाल्या, त्या कोणत्या ते पाहूया…

२०१९ या वर्षातील सर्वात यशस्वी संघ कोणता असेल तर तो म्हणजे भारतीय संघ होय. २०१९ मध्ये भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी सर्वाधिक ८७.५० इतकी राहिली आहे. भारतीय संघाने एकूण आठ सामने खेळले असून त्यापैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ही भारतीय संघासाठी कौतुकाची बाब आहे. विशेष नोंद करावी असे म्हणजे भारतीय संघाने या वर्षी एकही कसोटी सामना गमावलेला नाही. ३ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित झाला होता.

भारतीय संघानंतर विजयाच्या बाबतीत १ नंबरला असून त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघ आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण १२ सामन्यांपैकी ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर २ सामन्यांमध्ये पराजय पत्कारला आहे आणि दोन सामने ड्रॉ झाले आहेत. या वर्षी कमीत कमी आठ कसोटी सामने खेळणाऱ्या संघांमध्ये इंग्लंडची कामगिरी सर्वात खराब ठरली असून इंग्लंडने १२ पैकी फक्त चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने ६ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे.

या वर्षात फक्त १०.२६ टक्के कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत. आणि ही १० कसोटी सामन्यांमधील आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

या वर्षाची खास बाब म्हणजे २०१९ मधील अधिकतर कसोटी सामने हे निकाली निघाले आहेत. या वर्षी सर्वात कमी सामने ड्रॉ झाले असून वर्षाच्या अखेरीस झालेल्या दोन्ही बॉक्सिंग डे टेस्ट मॅचचा निकाल लागला आहे. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा तर सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव केला होता.

२०१९ मध्ये एकूण ३९ कसोटी सामने खेळले गेले आहेत त्यापैकी फक्त चार सामने ड्रॉ झाले आहेत. त्यात पहिला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, दुसरा न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, तिसरा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि चौथा इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने ड्रॉ झाले आहेत. १९७० नंतर २०१९ हे वर्ष कसोटी सामन्यांसाठी अतिशय शानदार राहिले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने २२२ वनडे डावात ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा २७६ डावातील ११ हजार धावांचा विक्रम मोडला आहे.

वेस्ट इंडिज संघाच्या जॉन कॅम्बल आणि शाई होप या जोडीने देखील एक नवीन विक्रम केला आहे. त्यांनी आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडेमध्ये पहिल्या विकेटसाठी ३६५ धावांची भागिदारी केली. वनडे क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागिदारी ठरली.

ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने देखील कमी डावात ७००० धावा पूर्ण करत इंग्लंडच्या वॉली हॅमंडचा १३१ डावाचा विक्रम मागे टाकला. स्मिथने एकूण १२६ डावात ही कामगिरी केली आहे.

या २०१९ वर्षात ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन याने देखील कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने ११ कसोटी सामन्यांत एकूण १६ डावात ६४.९४ च्या सरासरीने ११०४ धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे या फलंदाजाने या वर्षात फक्त दोन षटकार मारले आहेत.

रणजी स्पर्धेच्या इतिहासात देखील प्रथमच एखाद्या संघाने फॉलोऑन मिळाल्यानंतर विजय मिळवला आहे. झारखंडने त्रिपूराचा ५४ धावांनी पराभव केला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/