मी येतोय… तुम्ही पण या…, गोपीचंद पडळकर करणार मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळण्याचे अनावरण, शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपणार

हिंगोली : ऑनलाइन – जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या अनावरणावरून आघाडी सरकार आणि भाजपमध्ये चांगलाच वाद रंगला होता. त्यानंतर औंढा नागनाथमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. मागील वर्षापासून पुतळ्याचे लोकार्पण रखडलं आहे. आता शिवसेना-भाजपच्या आमदारांनी या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मेंढपाळ बांधव आणि भगिनींच्या हस्ते होणार आहे. तसेच मी येतोय, तुम्ही पण या, असा हॅशटॅग त्यांनी दिला आहे.

पडळकर यांनी ट्विटसोबत व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अनेक मंदिरांची उभारणी आणि जीर्णोद्धार करून हिंदू संस्कृती अबाधित ठेवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा हिंगोलीतल्या औंढा नागनाथ ट्रस्टने उभारला आहे. पण या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या वर्षभरापासून वेळ मिळालेला नाही. ते बहुधा माझं कुटुंब माझी जबाबदारी यामध्ये व्यस्त आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

पडळकर पुढे म्हणाले, महापराक्रमी मल्हारराव होळकर यांची जयंती 16 मार्चला आहे. या दिवसाचे औचित्य साधून दुपारी एक वाजता अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक व्हावं, असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे.

शिवसेनेकडून 11 मार्चला अनावरण

शिवसेनेकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण 11 मार्च रोजी करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील ज्येष्ठ वयोवृद्ध भूषण होळकर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिली. बांगर यांनी सांगितले की, आधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे शक्य नाही. त्यामुळे या पुतळ्याचे अनावरण महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यात येणार आहे.