‘कोरोना’ व्हायरसपासून स्वतःला दूर ठेवा : जोशी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने घरात योग करायला सुरूवात करा आणि कोरोना व्हायरसपासून स्वतःला लांब ठेवा. योग हाच स्वस्थ आरोग्याचा पासवर्ड आहे. शारीरिक आणि मानसिक रूपाने स्वस्थ होण्यासाठी योग साधनेची अत्यंत गरज आहे, असे आवाहन प्राचार्या उन्नती जोशी व मुख्याध्यापीका दीपाली शितोळे यांनी केले.

जेएसपीएम हडपसर संकुलातील सिग्नेट पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये डिजिटल माध्यमाच्या मदतीने ‘जागतिक योग दिवस’ साजरा केला. यंदाच्या योग दिनाचे ‘घरच्या घरी योग, सुरक्षित योग’ असे घोषवाक्य देण्यात आले होते. शाळा प्रशासनाकडून सर्व शिक्षक, विदयार्थी व पालक या सर्वांना योग दिवसात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. शाळेचे योगा शिक्षकानीं विद्यार्थ्यांना प्राणायम, ताडासन अशी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. सर्वांनी त्याचे अनुकरण केले. शाळेतील सर्व शिक्षक ,विदयार्थी व पालक वर्गाने या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जोशी म्हणाल्या की, शाळेच्या झूम, गुगल मिटिंग अशा विविध प्रकारच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या सहाय्याने एकमेकांच्या साक्षीने योग करण्यात आला. दरवर्षी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात योगासने करण्यात येतात. मात्र, यंदा कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. यंदा त्याचे स्वरूप डिजीटल आहे, असे त्यांनी सांगितले.