‘घरी राहा नाहीतर ‘विकेट’ पडेल’ कल्याण डोंबिवली महापालिकेचे अनोखे ‘पोस्टर’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्यानंतरही अनेकांकडून घराबाहेर भटकंती करण्यास पसंती दिली जात आहे. त्यामुळे व्हायरसचा वेग पसरला आहे. त्यापार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अनोखे पोस्टर तयार केले आहे. घरी राहा नाहीतर विकेट पडेल अशा आशयाचे पोस्टर चौकात लावण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

कोरोनाची जनजागृती करण्यासाठी पोस्टरला वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये घरी राहा, सुरक्षित राहा असा संदेश देण्यात आला आहे. तसेच पोस्टरमध्ये एक पोलीस कोरोना व्हायरसला काठीने टोलवतो आहे असे दाखवण्यात आले आहे. पोलिसाच्या चेहर्‍यावर मास्क आहे. नागरिक स्टंपच्या रुपात आहे. कोरोना व्हायरसला चेंडूच्या रुपात दाखवण्यात आले आहे. घरी राहा नाहीतर विकेट पडेल असा संदेशही देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस तुमची विकेट घेऊ पाहतो आहे त्यामुळे घरी राहा आणि सुरक्षित राहा असा संदेश या पोस्टरमध्ये देण्यात आला आहे. पोलीस हे नागरिक आणि कोरोना व्हायरस यांच्यामध्ये एखाद्या बॅट्समन प्रमाणे उभे आहेत आणि त्याचा मुकाबला करुन त्या व्हायरसला पळवून लावत आहेत. हे पोस्टर डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरले आहे. कल्याण डोंबिवली 120 वर कोरोना रुग्ण आहेत. घऱी राहा, लॉकडाउनचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा असा संदेश या पोस्टरमधून देण्यात आला आहे.