मेट्रो कारशेडच्या स्थगितीवरून फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज दुपारी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. यानंतर त्यांनी मुंबईतील विधीमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरेच्या कारशेडच्या स्थगितीचा निर्णय घेतल्याचे सांगीतले. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडला स्थगिती देणं हे दुर्दैवी असल्याचं म्हणत टीका केली आहे. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच आहे असेही ते म्हणाले आहेत. फडणवीसांनी याबाबत ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच.”

आणखी एका ट्विटमध्य फडणवीस म्हणतात, “जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील.” असेही त्यांनी म्हटले आहे.

परंतु आदित्य ठाकरेंनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून या निर्णयामुळे मुंबईतील सर्वच नागरिक आनंदी झाले आहेत. विकासकामे सुरू राहतीलच, परंतु पर्यावरणाला होणारी हानी चालणार नाही. त्यामुळे आरेतील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली आहे.”असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

Visit : Policenama.com