शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहा : सुधीरचंद्र जगताप

पुणे : सिक्युरिटी महिला कर्मचारी म्हणून काम करीत असताना अनेक अडचणी येतात. त्यावर मात करणे गरजेचे आहे. कामाची जबाबदारी पार पाडत असताना तंदुरुस्त राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी दररोज ध्यान, व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. संकटाला घाबरून न जाता प्रतिकार करणे ही काळाची गरज आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहा, असा सल्ला माजी सैनिक सुधीरचंद्र जगताप यांनी दिला.

जागतिक महिला दिनानिमित्त अ‍ॅमनोरा मॉल येथे सिस, युनिक आणि युनिफाय सिक्युरिटी कंपनीमधील सिक्युरिटी महिलांना स्वसंरक्षण आणि नियमित व्यायामाचे महत्त्व या विषयी माजी सैनिक सुधीरचंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अमानोरा मॉल सिक्युरिटी कंपनीचे सहसरव्यवस्थापक वेंकट तारक, सिक्युरिटी व्यवस्थापक किशोर शिंदे, सिक्युरिटी ऑफिसर देवेश केळकर, कांगलेचा मार्शल आर्टचे ब्लॅकबेल्ट पदवीधर एम. डी. चार्मडी, सुवर्णपदक विजेत्या बकुल ढोले, 13 पदकाचे मानकरी कृष्णा अभंग, ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे आणि सिक्युरिटी महिला कर्मचारी उपस्थित होत्या. यावेळी कांगलेचा मार्शल आर्टचे जनक टोनी मेटे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष शुभेच्छा संदेश पाठविला होता. त्याचे जगताप यांनी वाचन करून दाखविले.

माजी सैनिक सुधीरचंद्र जगताप, कांगलेचा मार्शल आर्टचे ब्लॅक बेल्ट पदवीधर एम. डी. चार्मडी, सुवर्णपदक विजेत्या बकुल ढोले, 13 पदकाचे मानकरी कृष्णा अभंग यांनी स्वसंरक्षण कसे करावे या विषयी प्रात्यक्षिक करून दाखविले.

जगताप म्हणाले की, सिक्युरीटीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. महिला आता चुल आणि मूल एवढ्यावरच थांबली नाही. राजकारण, समाजकारण, शिक्षण, एसटी बस चालक, वाहक, रेल्वेचालक, वैमानिक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील अशा अनेकविध क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलावर्गाकडून चांगल्या पद्धतीने काम केले जात आहे, ही बाब प्रकर्षाने निदर्शनास येत आहे. अनेक महिला नोकरी करून कुटुंबाचा भार सांभाळत आहेत. मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. महिलांनी कुटुंबाच्या आरोग्याबरोबर स्वतःच्या आरोग्याकडेसुद्धा लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, एम. डी. चार्मडी यांनी सांगितले की, कांगलेचा मार्शल आर्ट ही संस्था मागिल 35 वर्षांपासून विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहे. या संस्थेमधून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी आर्मी पोलीस अधिकारी, तसेच उच्च पदावर कार्यरत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सिक्युरिटी ऑफिसर देवेश केळकर यांनी सूत्रसंचालन केले.