स्टील कंपन्यांची चांदी ! दरात केली दुप्पट वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या कोरोना काळात लोकांकडे पैशांची कमतरता आहे. अनेकजण येनकेन प्रकारे दिवस ढकलत आहेत. अशावेळी धातूंचे दर वाढवल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. देशात अचानक वाढत असलेल्या लोखंड आणि इतर धातूंच्या वाढत्या किंमतींमुळे व्यावसायिक चिंतीत झाले आहेत. याचा थेट परिणाम ऑटोमोबाइल, ऑटो स्पेअर पार्ट्स, बांधकाम आणि उद्योगांच्या उत्पादनावर होत आहे. मागील सहा महिन्यांत स्टीलच्या दरात ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे त्रस्त व्यावसायिकांनी सरकारकडे धाव घेतली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन दिले आहे. यासाठी स्टील कंपन्यांची बैठक घ्या आणि त्यात व्यावसायिकांनाही सामील करुन घ्या, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे. या बैठकीत स्टील आणि इतर धातुंच्या किंमतीत वाढ का होत आहे, अशी विचारणा केली जावी, असेही या व्यावसायिकांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही असोचेमच्या बैठकीत कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीवर चिंता व्यक्त केली आहे. यामुळे उद्योगधंदे प्रभावित होत आहेत. सरकार लवकरच याविषयावर काही निर्णय घेईल, असे ऑटोमोटिव्ह अँड जनरल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितले. लोखंड, कॉपर, ब्रास समवेत इतर धातू, खनिजाचे दर मागील एक-दीड महिन्यांपासून ३० टक्के वाढले आहेत. यामुळे लघु-कुटीर उद्योग धोक्यात आले आहेत. त्यामुळे सरकारने एक नियामक संस्था बनवण्याची मागणी केली जात आहे. पोलाद, प्लास्टिक आणि किंमती धातूंसारख्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे मारुती सुझुकी, हुंडाई इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, किया मोटर्स आणि रेनॉ इंडियासारख्या कंपन्या जानेवारी २०२१ मध्ये किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे (सीटीआय) अध्यक्ष बृजेश गोयल यांनी याबाबत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाच्या काळात स्टील कंपन्या मनमानी करत आहेत. सर्वजण नफेखोरी करत आहेत. मागील सहा महिन्यांत ५०टक्क्यांनी दर वाढले आहेत. १०-२० टक्क्यांची वाढ तर्कसंगत मानली जाऊ शकते. परंतु, ५० टक्क्यांचा फायदा हे विचारापलीकडचे आहे. यामुळे महागाई वाढत आहे. विविध प्रकारचे ऑटो पार्ट्स, वाहनांचे पार्ट्स, स्कूटर, तीन चाकी-चार चाकी वाहनांमध्ये स्टीलचा मोठ्याप्रमाणात वापर होतो. घर बांधतानाही स्टीलचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. रस्ते आणि पुल निर्मितीमध्येही स्टीलचा वापर केला जातो. या सर्वांचा उत्पादन खर्च यामुळे आता वाढला आहे.