धक्कादायक ! आई, मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केला मुलाचा खून

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आई आणि मुलामध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सावत्र बापाने मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कॅम्प नं 4 येथील व्हिनस चौक परिसरात घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सावत्र बापाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेची माहिती मृत मुलाच्या लहान भावाने विठ्ठलवाडी पोलिसांना दिली. या प्रकरामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प 4 परिसरातील व्हिनस चौक परिसरात एक महिला आपल्या तीन मुलांसह रहात होती काही महिन्यांपासून विजय चव्हाण नावाचा व्यक्ती त्यांच्याकडे रहाण्यास आला होता. महिलेसोबत आपण लग्न केल्याचे विजय चव्हाण सांगत आहे. गुरुवारी सकाळी पाचच्या सुमारास 23 वर्षीय सावत्र मुलगा राजेश खरात हा झोपेत असताना लोखंडी सळईने त्याला बेदम मारहाण केली. लोखंडी सळईचा मार डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मृत राजेशच्या लहान भावाने विठ्ठलवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सावत्र बाप असलेल्या विजय चव्हाण याला अटक केली. आई व मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र मुलाला संपविल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त डी डी टेळे यांनी दिली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.