UP पोलिस दलातील ‘तो’ धाडसी IPS अधिकारी , ज्यानं बजावली विकास दुबेच्या एन्काऊंटरमध्ये प्रमुख भूमिका, जाणून घ्या

कानपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  मागील आठवड्यापासून कानपूरमध्ये 8 पोलिसांना ठार मारणार्‍या विकास दुबेचा शोध सुरू होता. अखेर आरोपी उज्जैनमध्ये स्वत:हून हजर झाला. तेथील पोलिसांकडून त्याला ताब्यात घेऊन युपी पोलीस त्याला कानपुरला आणत असताना वाटतेच त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. अशाप्रकारे युपीच्या जनतेला दोन दशकापासून त्रास देणार्‍या या गुन्हेगाराचा अंत झाला. विकासचा शोध ते एन्काऊंटर सर्व मोहिम आयपीएस अमिताभ यांनी सांभाळली. हा अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. कोण आहे हा पोलीस अधिकारी, काय आहे त्याची माहिती ते जाणून घेवूयात…

कोण आहे अमिताभ यश

अमिताभ यश 1996 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. बिहारचे अमिताभ 4 सप्टेंबर 1996 ला पोलीस फोर्समध्ये नियुक्त झाले होते. तेव्हापासून ते धाडसी अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. मुळचे बिहारच्या भोजपुर जिल्हयातील असलेले अमिताभ यांनी पटणा येथे शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षणासाठी ते दिल्लीत आले. दिल्लीत केमिस्ट्रीतून बीएससी ऑनर्सनंतर आयआयटी कानपुरमध्ये केमिस्ट्रीसाठी दाखल झाले. यासोबतच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि 1996 मध्ये पोलीस सेवेसाठी त्यांची निवड झाली.

चंबळमधील दशहतवाद संपवला

जेव्हा विकास दुबे चंबळमध्ये लपल्याची खबर मिळाली, तेव्हा अमिताभ यांना त्यास पकडण्याची जबाबदारी मिळाली. या अधिकार्‍याने चंबळच्या खोर्‍यात भरपूर काम केले आहे. चंबळमध्ये डाकुंची दहशत संपवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ते चंबळमध्ये असताना दहशतवादी ददुआचा एन्काऊंटर खुप गाजला होता. या ददुआच्या परिसरात कुणाला आमदार, खासदारकीची निवडणूक लढायची असेल तर मोठी रक्कम त्याला अगोदर द्यावी लागत असे, यावरून ददुआची दहशत दिसून येते. असे न करणार्‍यास निवडणुक लढता येत नसे.

दहशतीमुळे त्याच्यावर युपी पोलिसांनी 5 लाख रूपये आणि मध्यप्रदेश पोलिसांनी 1 लाख रूपयांचे बक्षिस लावले होते. असे म्हटले जाते की, त्याने दोनशेपेक्षा जास्त लोकांना ठार केले होते. 2007मध्ये ददुआला मारण्याची जबाबदारी एसटीएफद्वारे अमिताभ यांच्याकडे आली. या पोलीस अधिकार्‍याने हेरगिरी करण्यासाठी पान दुकानवाल्यांना सुद्धा मोबाईल दिले. गुप्त पद्धतीने ऑपरेशन ददुआ पार पाडण्यात आले. त्याच वर्षी जुलैमध्ये ददुआला अमिताभ यांच्या टीमने ठार केले.

काय आहेत त्यांच्या विशेषत:

सायन्सचे विद्यार्थी असलेले अमिताभ यांना गुन्हेगारांना पकडण्याच्या वैज्ञानिक पद्धतींवरून ओळखले जाते. ते त्यांच्या टीमवर खुप विश्वास ठेवतात. अमिताभ यांची बहुतेक एन्काऊंटर प्रकरणे अतिशय गुप्त असतात. एसटीएफच्या त्यांच्या टीमशिवाय स्थानिक पोलिसांना सुद्धा या कारवाईची माहिती समजू दिली जात नाही.

एसटीएफचे आयजी असूनही अमिताभ यश यांनी अनेक गुन्हेगारांना टीमसोबत ताळमेळ आणि गुप्त ऑपरेशनच्या याच पद्धतींमुळे पकडले आहे. युपीमध्ये तैनात या अधिकार्‍याच्या नावाने दहशतवादी घाबरतात, असे म्हटले जाते. जर हा अधिकारी एखाद्या जिल्ह्यात तैनात असेल तर गुन्हेगार तो जिल्हा सोडून पळतात. अमिताभ यांचे वडील राम यश सिंह सुद्धा एक धाडसी पोलीस अधिकारी होते.

कसे केले विकास दुबेचे एन्काऊंटर

कानपुरच्या बिकरू गावात 8 पोलीस कर्मचार्‍यांची हत्या करून फरार झालेल्या विकास दुबेचा शोध स्थानिक पोलीस घेत होते. यामध्ये यश मिळत नसल्याने युपी पोलिसांवर देशभरातून टिका सुरू झाली होती. यादरम्यान शोध घेण्याची जबाबदारी एसटीएफचे प्रमुख अमिताभ यश यांना देण्यात आली. त्यांनी ताबडतोब अ‍ॅक्शन घेतली आणि विकासचा शोध सुरू केला.

याअंतर्गत सर्वप्रथम त्यांनी हरियाणा, बिहार आणि एमपीच्या सीमेवर सतर्कता ठेवण्यास सांगितली. घटनेच्या आठवड्यानंतर विकास स्वत:ताहून उज्जैनमध्ये शरण आला. त्याला उज्जैन पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर ताबडतोब यूपीवरून त्याला घेण्यासाठी टिम तेथे पोहचली. परंतु, त्याला युपीला आणताना कथितरित्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला, ज्यामध्ये विकाससुद्धा होता. यावेळी विकासने एका पोलिसावर हल्ला करून त्याचे शस्त्र हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यास एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले.

अमिताथ लीड करत असलेली युपी एसटीएफ काय आहे?

विकासच्या एन्काऊंटरनंतर एसटीएफ सुद्धा चर्चेत आहे. मात्र, हे एन्काऊंटर संशयास्पद ठरल्याने अनेक लोक त्यांना ट्रोल करत आहेत. पण काहीजण त्यांचे कौतूकही करत आहेत. मे 1998 मध्ये युपी पोलिसांचा एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला. फोर्सचा मुख्य उद्देश माफियांची माहिती घेणे आणि अशा गँगवर अ‍ॅक्शन घेणे. दरोडेखोरांच्या टोळ्यांचा खात्मा करणे हा सुद्धा एक उद्देश आहे. टास्क फोर्सची स्थापना एक गुन्हेगार प्रकाश शुक्ला यास पकडण्यासाठी झाली होती. हा माफिया तेव्हा संपूर्ण यूपी सरकारसाठी डोकेदुखी झाला होता. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी फोर्सने काम करण्यास सुरूवात केली. याच एसटीएफमध्ये काम करत असताना आयपीएस अमिताभ यश यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like