मुंबईत भेसळयुक्त मधाचा साठा जप्त, FDA ची कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   खाद्यतेलांच्या भेसळीसंदर्भात लागोपाठ केलेल्या तीन कारवाईंनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA ) मुंबईतून तब्बल 34 लाखांचे भेसळयुक्त मध जप्त केले आहे.

भायखळ्याच्या पूर्वेच्या दादोजी कोंडदेव क्रॉस रोड येथे असलेल्या अंडर द मॅन्गो ट्री नॅचरल अँड ऑरगॅनिक प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये कमी दर्जाचे मध साठवून ठेवल्याची माहिती एफडीएच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी एफडीएच्या अधिकार्‍यांनी कंपनीवर छापा टाकला. त्यावेळी कमी दर्जाचे मध ड्रममध्ये साठवून ठेवल्याचे आढळून आले. मध साठवलेल्या ड्रमवर कोणतेही लेबल नव्हते. तसेच मधाच्या रिपॅक बॉटल्सवर लेबलदोष आढळून आला. तसेच विक्रीसाठीही पॅक केलेले मध हेसुद्धा कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून एफडीएने 34 लाख 59 हजार 126 रुपयांचे तब्बल 2988 किलोग्रॅम वजनाचा मधाचा साठा जप्त केला. जप्त मधाचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे व सहाय्यक आयुक्त प्रि. अ. विशे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र जेकटे यांनी ही कारवाई केल्याची माहिती सह आयुक्त (अन्न) शशिकांत केंकरे यांनी दिली आहे.