‘झुम’ व्हिडिओ कॉलिंग मिटिंग अ‍ॅपवरुन चोरला डाटा, मागितली बिटकॉईन्सद्वारे ‘खंडणी’

कोलकत्ता : वृत्त संस्था  – झुम व्हिडिओ कॉलिंग मिटिंग अ‍ॅपचा वापर करणे धोकादायक आहे. त्यावरुन तुमच्या मोबाईलमधील डाटा चोरीला जाऊ शकतो, असा केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेला इशारा खरा ठरला आहे. कोलकाता येथील घरातून काम करणारे दोघे जण हॅकरचे शिकार ठरले आहेत. हँकर्सनी या दोघांकडे तब्बल १ हजार डॉलरची खंडणी बिटकॉईन्समार्फत मागितली आहे. जर खंडणी दिली नाही तर त्यांचा सर्व डाटा कायमस्वरुपी नष्ट करण्याची धमकी दिली आहे.

कोलकाता येथील दोघे जण वर्क फॉम होम नुसार घरातून काम करत होते. ते झुम व्हिडिओ कॉलिंग मिटिंग अ‍ॅपचा वापर करत होते. त्यांना बुधवारी एक ई मेल आला. त्यांच्या कॉम्प्युटरवरील सर्व डाटा इनक्रिप्ट (कॉम्प्युटरच्या फाईल सांकेतिक भाषेत सुरक्षित करणे) केली असल्याची माहिती दिली. हा सर्व डाटा परत हवा असेल तर बिटकॉईसद्वारे पैसे देण्याची मागणी केली. बिटकॉईन्स खरेदी करण्यासाठी एक ईमेलही शेअर केली आहे. त्यांची मागणी पूर्ण न केल्यास त्यांचा सर्व डाटा कायमस्वरुपी नष्ट करण्याची धमकी दिली आहे.

याबाबत एका पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, या दोन तरुणांच्या फाईली नष्ट करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे १ हजार डॉलरचे बिटकॉईनची मागणी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर क्राईम तसेच स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने तपास सुरु केला आहे.

देशात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर झुम अ‍ॅपच्या व्हिडिआ कॉलिंग प्लेटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांनी या अ‍ॅपच्या द्वारे ऑनलाईन क्लास सुरु केले आहेत. अनेक कंपन्यांनी ही आपल्याा कर्मचार्‍यांशी या अ‍ॅपमार्फत संपर्क ठेवत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने १६ एप्रिल रोजीच झुम अ‍ॅपविषयी सावधगिरीचा इशारा दिला होता.