दिल्लीत पुन्हा तणाव ! CAA विरोधक अन् समर्थकांमध्ये दगडफेक, परिस्थिती ‘कंट्रोल’मध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जाफराबाद येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे (CAA) समर्थन करणाऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. या दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रू धारांचा वापर करावा लागला. या घटनेमुळे खबरदारी म्हणून दोन मेट्रो स्टेशन्स देखील बंद करण्यात आली आहेत. सध्याला तरी परिस्थिती आटोक्यात आली आहे.

जाफराबादमध्ये सीएएच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या. तर भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात सीएएच्या समर्थनात मौजपूर चौकात अनेक लोकांची गर्दी जमा झाली होती. याच दरम्यान मौजपूर जवळील कबीर नगर मेट्रो स्टेशनजवळ सीएए विरोधक आणि समर्थक भिडले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर जाफराबाद येथे देखील सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली.

सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये कबीर नगर मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या दगडफेकीने परिसरात मोठा गोंधळ उडाला असून या दगडफेकीमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून त्याला पोलिसांच्या माध्यमातून रुग्णालयात हलवण्यात आई. घटनास्थळी पोलिसांनी अतोनात प्रयत्न पणाला लावून दगडफेक थांबवण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती हाताबाहेर जात होती. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या घटनास्थळी फोडल्या.

सहपोलीस आयुक्त आलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तणावग्रस्त भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान या गोंधळात जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. सध्या घटनास्थळी पोलिस बळ तैनात करण्यात आले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

दरम्यान सीएएविरोधी आंदोलनात अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील महिला विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. एवढंच नाही तर जामा मशिदीजवळील ट्रान्सफॉर्मर देखील पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे. असे अलिगढचे जिल्हाधिकारी चंद्रभूषण सिंह यांनी सांगितले.