बाईक रेसिंग करणाऱ्या टोळक्याची पोलिसांवर दगडफेक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एक्सप्रेस हायवेवरुन बदरकारपणे बाईक रेसिंग करणाऱ्या ४० ते ५० जणांच्या टोळक्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादाय प्रकार गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेसवर आज पहाटे चारच्या सुमरास घडला. याप्रकणी दिंडोशी पोलिसांनी रॅश ड्रायविंग आणि दंगल भडकवणे असा गुन्हा बाईक रेसिंग करणाऱ्यांवर दाखल करुन ७ जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाईक रेसिंग करणाऱ्या टोळीमध्ये काही जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या पालकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना काही मोटारसायकलस्वार रेसिंग करत येत असल्याची माहिती वायरलेस फोनवरून मिळाली. त्यानुसार गस्तीवर असलेल्या पोलिसांची गाडी ऑबेरॉय मॉलच्या नाक्यावर नाकाबंदी आली. त्यानंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून रेसिंग करत भरधाव वेगाने येणाऱ्या ४० ते ५० बाईकस्वारांना पोलिसांनी अडविले. तरीदेखील बाईकस्वार वेडीवाकडी मोटारसायकल चालवत होते.

पोलिसांनी बाईकस्वारांना थांबविल्यानंतर त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. मात्र, सुदैवाने दगडफेकीमुळे पोलीस जखमी झाले नाही. दगड पोलिसांच्या गाडीवर फेकले गेले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी दिली. ४० ते ५० बाईकस्वारांपैकी ७ जणांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ७ आरोपींपैकी ३ अल्पवयीन आरोपी आहेत. त्याचप्रमाणे काही अल्पवयीन बाईकस्वारांच्या पालकांना नोटीस पाठवून पोलीस बोलावतील त्यावेळी पोलीस ठाण्यात हजर करण्यास सांगितले आहे.