आंदोलनं करण्यापेक्षा साखर विकत घ्या राजू शेट्टींना सहकार मंत्र्यांचा टोला 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वारंवार एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत मात्र याबाबत बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेट्टी यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. आंदोलनं  करण्यापेक्षा साखर विकत घ्या असा खोचक टोला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे. देशमुख हे सांगलीमध्ये महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या बेघर निवारा केंद्राच्या उदघाटनासाठी आले असता बोलत होते.

यावेळी  बोलताना ते म्हणाले, की एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे आता आंदोलन करत आहेत मात्र साखरेला बाजारपेठत उचलच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. राजू शेट्टींनी मध्यंतरी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आता शिल्लक राहिलेली साखर विकत घ्यावी आणि शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळवून द्यावी. कारखानदारांना आवाहन करतो की, त्यांनी राजू शेट्टी यांना साखर विकत द्यावी आणि एफआरपीचा तोडगा काढावा. आशा शब्दात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी खा. राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. तसेच शेट्टी म्हणत आहेत की, सहकार मंत्र्यांच्याच कारखान्याची एफआरपी थकीत आहे. पण शेतकऱ्यांना १०० एफआरपीची रक्कम मिळणार आहे हे निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी खा. संजयकाका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेशी युती कोणत्याही परिस्थितीत होणार : सुभाष देशमुख

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपनेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेना हा आमचा मित्र पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत आमची युती होणारच आहे, त्यात काही शंका नाही. काही नेत्यांचे मतभेद हे होत असतात यावर मार्ग काढून नेत्यांचे मतभेद मिटवून तोडगा काढून युती होईलच, असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.