शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्याचे कंत्राटदाराला आदेश 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याचे दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश शिरसावंद्य ठेवून शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिवस्मारकाचे बांधकाम थांबवण्याचे आदेश मागील काही दिवसांपूर्वी दिले होते.

पर्यावरणवादी ‘देबी गोयंकां’ च्या कॉन्झर्व्हेशन अॅक्शन ट्रस्टने शिवस्मारकाच्या बांधकामाला स्थगीती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. स्मारक बांधण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या परवानग्यांना मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने अंतरिम मनाई हुकूम देण्यास नकार देताच या पर्यावरणवादी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या ठिकाणी मात्र बांधकामावर स्थगिती मिळवण्यास या संस्थेला यश मिळाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सरकारी वकिलांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी स्वरूपात कळवल्यानंतर आता या बाबतचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे. या आदेशानंतर कंत्राटदाराला द्याव्या लागणाऱ्या पेमेंटवर बांधकाम विभाग फेर विचार करणार आहे. या सर्व निर्णयाच्या पेच प्रसंगावर तोडगा काढण्यासाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर मेटे या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

‘त्या’ शस्त्रांनी भाजपला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या : जयंत पाटील 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us