Pune : नगरसेवकांचे हट्ट थांबवा ‘आप’चे आयुक्तांना पत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या हट्टासाठी चौदा लाख रुपयांचे एक झाड अशी पासष्ट झाडे महापालिका खरेदी करणार आहे. ही खरेदी थांबवावी अशी मागणी आम आदमी पार्टीने पुणे महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

सॅलसबरी पार्क येथील उद्यानासाठी ही झाडे खरेदी करण्यात येणार आहेत. चौदा लाख रुपये किमतीच्या झाडाची वाहतूक आणि त्याचे रोपण या सगळ्याचा मिळून खर्च काढला तर तो अठरा लाख रुपये प्रति झाड असा असेल. अशी चार ते चौदा लाख रुपये किमतीची पासष्ट झाडे महापालिका खरेदी करणार आहे. यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च येणार आहे. आम आदमी पार्टीचा या खर्चाला विरोध आहे. कोरोना संकटाच्या काळात आर्थिक समस्याही समोर आल्या आहेत. हा निधी आरोग्यासाठी खर्च व्हावा याकरिता आयुक्तांनी झाडे खरेदीच्या निविदा थांबवाव्यात अशी मागणी आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी आयुक्तांकडे केली आहे.

चित्रविचित्र आकाराच्या झाडांचे आकर्षण महापालिकेस का वाटावे? हा गहन प्रश्न आहे. या प्रकारच्या टोपीयरी बागा म्हणजे विविध आकाराचे वृक्ष, झाडांच्या बागा. व्यवसाय वृद्धीसाठी क्लब, फार्म हाऊस, पार्टी प्लॉट या ठिकाणी अशा प्रकारच्या बागा केल्या जातात. त्याची देखभाल खर्चिक आणि या बागांमधील काम कौशल्याचे असते. यापूर्वी जनतेच्या पैशातून पुण्यात आबा बागुल यांच्या आग्रहासाठी फुलपाखरू गार्डन तर मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या हौसेसाठी पेंग्विन पक्षी आणले होते. असे हट्ट आणि उपदव्याप थांबवावेत असे किर्दत यांनी पत्रकात म्हटले आहे.