‘त्या’ शिवस्मारकाचे काम थांबवा : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अरबी समुद्रातील छत्रपतींचे स्मारकाचे काम सुरू करू नका, असे तोंडी निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिल्याने शिवस्मारकाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पर्यावरण संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. काॅन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट या पर्यावरणवादी देबी गोयंकांच्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात स्मारकाच्या कामाला अंतरिम स्थगिती देण्याच्या मागणीसाठी ही याचिका दाखल केली आहे. जनहित याचिकेच्या माध्यमातून शिवस्मारकाच्या अरबी समुद्रातील कामाला पर्यावरणविषयक परवानगी देणाऱ्या केंद्राच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याचिका प्रलंबित असताना अंतरिम मनाई हुकूम देण्यास न्यायालयाने नकार दिल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नयनतारा सहगल प्रकरण : नगरमध्ये सांस्कृतिक दहशतवाद विरोधी समितीकडून निषेध

मुंबईच्या समुद्रात गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या १६.८६ हेक्टर आकाराच्या खडकावर शिवस्मारक उभारले जाणार आहे. चौपाटीपासून ही जागा ३.६ किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून २.६ किमी अंतरावर, तर राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आहे. या स्मारकाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नवी मुंबई, वर्सोवा या ठिकाणांहून बोटसेवा उपलब्ध असणार आहे.