‘ते’ बॅनर काढा ; मतदानाच्या दिवशीच भाजप – सेना पदाधिकाऱ्यांचा रास्ता रोको

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी कसबे तडवळा येथील एका शेतकऱ्याने उमेदवाराचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली होती. त्याच्या श्रद्धांजलीचे बॅनर काढावे या मागणीसाठी भाजप – शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर-बार्शी राज्यमार्गावर रास्ता रोको केला.

उस्मानाबाद मधील कसबे तडवळा येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने 12 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना उमेदवाराचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली होती. त्यानंतर काही जणांनी आज मतदानाच्या दिवशीच गावात त्यांच्या श्रध्दांजलीचे बॅनर लावले. मतदानाच्या दिवशीच हे बॅनर मतदानावर प्रभाव पाडत असल्याचा दावा शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांनी केला. इतकेच नव्हे तर ते बॅनर तातडीने काढण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. मात्र मागणीचा काही फायदा झाला नसल्याने भाजप – शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर-बार्शी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

आंदोलन सुरु झाल्यानंतर स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांनी आंदोलन कारण्यातची भेट घेतली. आणि त्यानंतर बॅनर तातडीने काढण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले. लातूर-बार्शी राज्यमार्गावरील रास्त रोको १ तास चालला. आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.