राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांत 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान वादळी पाऊस, पुण्यात ‘ऑरेंज अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पावसाने राज्यभरात वाईट अवस्था केलेली असतानाच हवामान तज्ज्ञांनी 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर नाशिक, खांदेश आणि औरंगाबाद जिल्ह्यात 8 ऑक्टेबर रोजी काही प्रमाणात ढगाळ हवामान असेल आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यासह उर्वरीत मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती 11 ऑक्टोबरपर्यंयत राहणार आहे. नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, शेतीचे नियोजन करून काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्याने शेतकऱ्यांनी काळजी करू नये असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे हवामानाच्या स्थितीनुसार शेतकऱ्यांनी नियोजन करावे असा सल्ला देण्यात आला आहे.

इतकेच नाही तर कृषी विभागाने शेतकऱ्यांना वादळ तसेच विजांपासून संरक्षण करण्यास सांगितले आहे. कोणीही मोकळ्या जागेत, झाडांखाली, पत्र्याच्या शेडखाली, वीजप्रवाह असणाऱ्या तारांखाली, विद्युत रोहित्रांनजिक आसरा घेऊ नये असे आवाहनही कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

पुण्यात आगामी 3 दिवस ऑरेंज अलर्ट
शहर आणि जिल्ह्यात आगामी 3 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी देखील पडणार असल्याने हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, रविवारी दुपारी पुन्हा एकदा पावसाने पुणेकरांना झोडपले. कात्रज, स्वारगेट, कोथरूड, औंध आणि शिवाजीनगर परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. दरम्यान, सिंहगड रस्त्यावर आणि धायरी व नांदेड फाटा परिसरात ऊन होते. आगामी 3 दिवस हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिल्याने पुणेकरांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com