लॉकडाऊन संपला तर डिसेंबरपर्यंत देशातील निम्मे लोक होतील कोरोना संक्रमित : व्हायरसचे जाणकार व्ही. रवी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वरिष्ठ व्हायरस तज्ज्ञ व्ही. रवी यांनी म्हटले आहे की, देशात लॉकडाऊन संपल्यास कोरोना व्हायरसच्या प्रकरणांची संख्या वेगाने वाढेल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थ अ‍ॅण्ड न्यूरो सायन्सचे न्यूरोव्हायरोलॉजी विभाग प्रमुख आणि कर्नाटक सरकारने कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात नेमलेल्या टास्क फोर्सचे नोडल ऑफिसर व्ही रवि यांनी देशात कोरोना कम्युनिटीच्या संसर्गाबाबत इशारा दिला आहे.

व्ही रवि म्हणाले, जर लॉकडाउन 4.0 देशात 31 मे रोजी संपला तर जूनपासून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची संख्या वेगाने वाढेल आणि कम्युनिटी लेव्हलवर तो पसरेल. डिसेंबरच्या शेवटपर्यंत अर्धी लोकसंख्या कोरोनाने बाधित झालेली असेल, मात्र 90 टक्के पेक्षा जास्त लोकांना हे सुद्धा कळणार नाही की त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला हेाता.

ते म्हणाले की, केवळ 5-10 टक्के प्रकरणांमध्ये हाय फ्लो ऑक्सिजनच्या मदतीने उपचारांची आवश्यकता असेल आणि केवळ 5 टक्के प्रकरणांमध्ये व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल. त्यांनी राज्यांना सल्ला दिला की, आरोग्याच्या पायाभूत सुविधा सज्ज ठेवल्या पाहिजेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सर्व राज्य सरकारांना सर्व जिल्ह्यांमध्ये किमान दोन टेस्टिंग लॅब सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी कर्नाटक 60 प्रयोगशाळांचे लक्ष्य गाठणारे पहिले राज्य ठरले.

देशातील कोरोना मृत्यूदराबाबत व्ही रवि म्हणाले, देशात तो 3-4 टक्के राहिला आहे, तर गुजरातमध्ये सर्वात जास्त 6 टक्के मृत्यूदर आहे. आपल्याला लसीसाठी पुढच्या वर्षी मार्चपर्यंत वाट पहावी लागेल. लोक सर्व खबरदारी घेऊन कोविड -19 बरोबर जगणे शिकतील. कोरोना विषाणू हा इबोला, मार्स व सार्ससारखा घातक नाही.

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे, जो उद्या संपत आहे. 1 जूनपासून देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू होईल की नाही याची सरकारने अद्याप घोषणा केलेली नाही. देशात गेल्या 24 तासात कोरोना संसर्गाची सुमारे 8 हजार नवीन प्रकरणे समोर आली असून 11 हजारांहून अधिक रिकव्हर घाले आहेत.