मोदी सरकारच्या 6 वर्षात 32,868 बँक घोटाळे, सामान्य लोकांचे 2 लाख 70 हजार कोटी बुडाले : काँग्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आणि कार्यकाळाची सहा वर्षे पूर्ण झाल्यावर काँग्रेस पक्षाने सरकारवर अनेक मोठे आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षाने शनिवारी म्हटले की, मोदी सरकारच्या ६ वर्षात ३२ हजार ८६८ बँक घोटाळे झाले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी वेणुगोपाल यांनी व्हिडिओ लिंकद्वारे पत्रकारांना म्हटले की, “मोदी सरकारच्या ६ वर्षात ३२,८६८ बँक घोटाळे झाले, ज्यात सामान्य लोकांचे २ लाख ७० हजार ५१३ कोटी रुपये होते.” ते म्हणाले की, एकीकडे बँकांची परिस्थिती बिघडत आहे तर दुसरीकडे मोदी सरकार घोटाळेबाजांचे कर्ज सवलत खात्यात टाकत आहे.

वेणुगोपाल म्हणाले, “मोदी सरकारच्या सहा वर्षात बँकांची मालमत्ता १६,५०,००० कोटींवर पोहोचली आणि एनपीए ४२३ टक्क्यांनी वाढला. मोदी सरकारने सहा वर्षांत बँकेची फसवणुक करणाऱ्यांचे ६,६६,०००० कोटी रुपये सवलत खात्यात टाकले.” ते म्हणाले, “सर्वात आश्चर्यकारक खुलासा २४ एप्रिल २०२० रोजी आरटीआय अंतर्गत मिळालेल्या उत्तरात झाला.” कोविड-१९ संकटादरम्यान मोदी सरकारने मेहुल चोकसी, नीरव मोदी, जतिन मेहता, विजय मल्ल्या या घोटाळेबाजांचे ६८,६०७ कोटी रुपये सवलत खात्यात टाकले आहेत.”

केसी वेणुगोपाल यांनी जीडीपीच्या कमी होण्याचा संदर्भ देत म्हटले की, मोदी सरकारमध्ये जीडीपी म्हणजे ग्रॉसली डिक्लायनिंग परफॉर्मन्सेस. स्वातंत्र्यानंतर जीडीपी सर्वात खालच्या पातळीवर आला आहे. बर्‍याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींनी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी नकारात्मक जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी लोकांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु बेरोजगारीचे प्रमाण २७ टक्क्यांपर्यंत गेले आहे. २०१७-१८ मध्ये भारतात बेरोजगारीचे प्रमाण ४५ वर्षात सर्वाधिक होते. कोविडनंतर भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढून २७.११% झाले आहे.