प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या भाषणाचा Video व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारताकडून ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच घरी पराभव केल्यानंतर आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताच्या नावे केल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या भाषणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यात, ते जखमी झालेल्या योद्धांचे त्यांचे धैर्य, जिद्द आणि उत्कटतेबद्दल अभिनंदन करत होता. यावेळी, खेळाडू आणि कोचिंग स्टाफ सोबत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य पसरले होते आणि शिट्ट्या आणि टाळ्या वाजत होत्या. हा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या ऐतिहासिक विजयाच्या चार दिवसानंतर बीसीसीआयने आता कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला, जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये रहाणे असे बोलताना दिसत आहे की, “अ‍ॅडिलेडमध्ये आपल्यासोबत जे काही घडले (36 धावांवर ऑलआउट) ते धक्कादायक होते.” यानंतर आपण ज्या पद्धतीने मेलबर्नमध्ये आणि त्यानंतर मालिकेच्या पुढील सामन्यांमध्ये पुनरागमन केले, ते आश्चर्यकारक होते. एक-दोन नव्हे तर सर्व खेळाडूंनी या विजयासाठी प्रयत्न केले जे उत्कृष्ट होते. ”

दरम्यान, अ‍ॅडिलेडमधील झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर अजिंक्य रहाणेने मेलबर्न कसोटी सामन्यात संघाला केवळ संघटित केले नाही, तर चांगली कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना मोटिवेट देखील केले. रहाणेच्या नेतृत्वात बॉक्सिंग-डे कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत परतली, या सामन्यात रहाणे स्वत: टीमचा संकट निवारक म्हणून सिद्ध झाला आणि एक शानदार शतक झळकावले. सिडनी कसोटीत ऋषभ पंतला हनुमा विहारीच्या जागेवर पाठविण्याच्या निर्णयाबद्दल रहाणेचेही कौतुक झाले.

ब्रिस्बेन कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनच्या अनुपस्थितीत रहाणेचा अननुभवी गोलंदाजीच्या आक्रमणातून चांगली कामगिरी करण्याचा मार्गही खूप प्रभावी होता. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर पराभव केल्यानंतर त्यांचा 32 वर्षांपासून या मैदानावर अजिंक्य राहण्याच्या विक्रमही मोडला. गाबामधील कांगारू संघाचा पराभव करणारा भारत पहिला आशियाई संघ बनला. टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरली. ब्रिस्बेन कसोटीत संघाच्या विजयात मोहम्मद सिराज आणि ऋषभ पंत हे दोघे नायक होते.