आयुष मंत्रालयानं ‘कोरोना’च्या उपचारासाठी लाँच केलेल्या पतंजलीच्या औषध प्रचारावर घातली बंदी, तपासणीसाठी मागितली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पतंजलीने आज लाँच केलेल्या कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी आयुर्वेदिक औषध कोरोनिलच्या प्रचारावर सरकारने बंदी घातली आहे. आयुष मंत्रालयाने आदेश दिला आहे की, पतंजलीने कोविड औषधाचा प्रचार तोपर्यंत करू नये, जोपर्यंत याबाबत चौकशी होत नाही. मंत्रालयाने पतंजलीकडे औषधाचा तपशील मागितला आहे, जेणेकरुन पतंजलीच्या दाव्याची चौकशी होऊ शकेल. आयुष मंत्रालयाने म्हटले आहे की, पतंजलीचे कथित औषध, औषध आणि चत्मकारिक उपचार (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा १९५४ अंतर्गत नियमित केले आहे.

औषध लाँच झाल्याच्या वेळी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी दावा केला होता की, हे औषध ३ ते १४ दिवसात कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करू शकते. हरिद्वारमधील पतंजली योगपीठ येथे लाँच दरम्यान बाबा रामदेव म्हणाले की, कोरोनिल औषधाची तपासणी करण्यात आलेल्या कोरोना रूग्णांपैकी ६९% रुग्ण फक्त तीन दिवसांतच पॉजिटीव्हपासून निगेटिव्ह झाले आणि सात दिवसांत १०० टक्के रुग्ण संसर्गमुक्त झाले.

कोरोना बरे करण्याचे कोरोनिल औषध लोक घरबसल्या देखील मागवू शकतात. ऑर्डर दिल्यानंतर काही तासांतच औषध डिलिव्हर केले जाईल. पतंजलीने सांगितले आहे की, येत्या सोमवारी औषधाच्या ऑनलाईन ऑर्डरसाठी ‘ऑर्डर मी’ हे मोबाइल ऍप लाँच केले जाईल, ज्याद्वारे हे औषध खरेदी करता येईल. त्याचबरोबर ज्यांना हे ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करायचे आहे, ते एका आठवड्यानंतर पतंजलीच्या स्टोअरमधून खरेदी करू शकतात.

औषधाच्या लाँच दरम्यान आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, हे औषध आणखी प्रभावी करण्यासाठी आम्ही औषधी वनस्पतींसह खनिज पदार्थांचा वापर केला आहे. ते म्हणाले की, कोरोना किटच्या माध्यमातूनही कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो. एका कोरोना किटची किंमत फक्त ५४५ रुपये असेल आणि हे किट ३० दिवसांसाठी असेल.