कोल्हापूरात ‘आमचं ठरलंय’ने दिला मंडलिकांना ठासून विजय

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर मतदार संघात लागलेला निकाल हा धक्कादायक निकाल होता. या मतदार संघात शिवसेनेच्या प्रा. संजय मंडलिक यांनी बाजीला मारली. त्यांना ७ लाख ४९ हजार ०८५ इतकी मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना ४ लाख ७८ हजार ५१७ मते मिळाली. मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना तब्बल २ लाख, ७० हजार ५६८ मतांनी पराभूत केले. वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अरुणा माळी यांना ६३ हजार ४३९ मते मिळाली.

प्रा. मंडलिक यांना पहिल्या फेरीपासून मताधिक्य होते. हे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिले. शेवटी मोजण्यात आलेल्या टपाली मतदानातही प्रा. मंडलिक यांनाच १७१३ इतके मताधिक्य मिळाले. २ लाख ७० हजार मताधिक्य प्रा. मंडलिक यांना मिळाले. हे मताधिक्य जिल्ह्यात विक्रमी आहे. यापुर्वी १९९१ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात अधिक २ लाख ५७ हजार ५९ इतके मताधिक्य इचकलंजी लोकसभा मतदारसंघातून बाळासाहेब माने यांना मिळाले होते.

सतेज पाटलांनी वादा निभाया

खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील हे वैर डोके वर काढत असल्याचे बोलले जात होते. सतेज पाटील यांचा कोल्हापुरात चांगलाच दबदबा आहे. सतेज पाटील स्वतः जरी लोकसभेच्या रिंगणात नसले तरी मात्र आघाडीत असून देखील शिवसेनेला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत याचा फटका महाडिकांना आणि राष्ट्रवादीला बसला. काही करून मंडलिक यांना निवडून आणायचे याचा निश्चय होता. मांडलिकांना विजय मिळवून देण्याचा ‘वादा’ सतेज पाटलांनी निभावला.

‘आपलं ठरलंय’ चीच सरशी

‘आमचं ठरलंय’ म्हणत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सगळी रसद शिवसेनेच्या प्रा. मंडलिक यांना पुरवली होती. तर खा. शरद पवार यांनी ‘मीबी ध्यानात ठेवलंय’ असे प्रत्युत्तर ‘आपलं ठरलंय’ या सोशल मीडियावरील प्रचारतंत्राला दिले होते. त्यामुळे निकालानंतर ‘आपलं ठरलंय’ लाच यंदाच्या निवडणुकीत सरशी मिळल्याचे पाहायला मिळाले. जरी लोकसभेचा निकाल लागला तरी ‘आपलं ठरलंय’ आणि ‘मीबी ध्यानात ठेवलंय’ चा संघर्ष लोकसभा निवडणुकांनंतर देखील चालूच राहणार अशी चिन्हे आहेत.

कागल

लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागले होते ते कागल तालुक्यामध्ये. या तालुक्यात खासदार आमचाच अशी घोषणा होती. तालुक्यातून सुमारे पाऊण लाखाचे मताधिक्य देऊन कागलकरांनी ही घोषणा अंमलात आणली. याबरोबरच महाडिक व आ. सतेज पाटील यांच्या वादामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडेही लोकांचे लक्ष होते. या मतदारसंघातून प्रा. मंडलिकांना ४३ हजार ६१७ इतके मताधिक्य मिळाले.

चंदगड

चंदगड मतदार संघातून शिवसेनेचे संजय मंडलिक यांना अधिक मते मिळल्याचे पाहायला मिळत आहे. मंडलिक यांना १,२०,८५७ मते मिळाली तर राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना चंदगड येथून ७०,७२६ मते मिळाली आहेत.

राधानगरी

राधानागरी मतदार संघातून मंडलिक यांना १, २६,१६० मते मिळली आहेत तर महाडिक यांना या मतदार संघातून ८६,९४५ मते मिळली आहेत. यावरून असे दिसून येते की राधानगरी , चंदगड येथील ग्रामीण भागातील जनतेने मंडलिक यांना आपला कौल दिला.

कोल्हापूर दक्षिण

कोल्हापूर दक्षिण मतदार संघात मात्र खासदार धनंजय महाडिक यांचा दबदबा आहे. त्यामुळे साहजिकच या मतदार संघात महाडिक यांना मताधिक्क्य मिळाल्याचे दिसत आहे या मतदार संघात महाडिक यांना १,२७,१७५ मते मिळाली तर मंडलिक यांना ८३,५५८ मते मिळाली.

कोल्हापूर उत्तर

या मतदार संघातील आकडेवारी मात्र निर्णायक ठरली. या मतदारसंघातुन मंडलिक यांना १,०१,८९२ मते मिळली तर राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना ७४,२३७ मते मिळाली. या मतदार संघातील जनतेने शिवसेनेच्या मंडलिक यांनाच कौल दिला.

करवीर

या मतदार संघात मंडलिक यांनी पुन्हा आघाडी घेत १,२०,८६४ मते मिळली तर राष्ट्रवादीच्या महाडिक यांना केवळ ८४,०५४ मतांवर समाधान मानावे लागले.

————————————-
विधानसभा निहाय आकडेवारी
————————————-
मतदार संघ – मंडलिक – महाडिक

कागल – १,४८,७२७ – ७७,३००

चंदगड – १,२०,८५७ – ७०,७२६

राधानगरी – १,२६,१६० – ८६,९४५

कोल्हापूर द. – ८३,५५८ – १,२७,१७५

कोल्हापूर उ – १,०१,८९२ – ७४,२३७

करवीर – १,२०,८६४ – ८४,०५४