Lockdown दरम्यान पक्षानं कोणती कामं केली ? PM मोदींसमोर BJP सादर करेल ‘रिपोर्ट’कार्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  कोरोना संक्रमण काळात देशभरात भारतीय जनता पक्षाने चालविलेले कार्यक्रम शनिवारी (4 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर सादर केले जातील. शुक्रवारी (3 जुलै) येथे पत्रकार परिषदेत भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले की, पक्षाच्या सर्व राज्य घटकांकडून सादरीकरणे करण्यात येतील जी पूर्णपणे डिजिटल असतील.

सिंह यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, ‘लॉकडाऊनमध्ये झालेल्या कामांचे सविस्तर सादरीकरण शनिवारी सायंकाळी चार वाजता सर्व राज्यातील पक्षीय संघटनांकडून सादर केले जातील. हे नमो अ‍ॅपशिवाय दुसऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील प्रसारित केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आमचे सर्व वरिष्ठ नेता यावेळी उपस्थित राहतील.’

सिंह म्हणाले की, या काळात केंद्र सरकारने गरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या, ज्याची माहिती कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांना दिली आणि कोरोना संसर्ग टाळण्याचे मार्गही त्यांना सांगितले. या दरम्यान 22 कोटी लोकांना अन्न दिले गेले. यासह दोन कोटी 30 लाख मास्क आणि 80 लाख सॅनिटायझरच्या बाटल्यांचे वाटप देखील करण्यात आले.

लॉकडाऊन दरम्यान भाजपच्या अनेक खासदार आणि आमदार यांच्या निवासस्थानी फेस मास्क तयार करुन त्यांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो अजूनही चालू आहे. ते म्हणाले की या काळात शहरांतून प्रवास करणाऱ्या कामगारांना मदत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आणि त्यांना आवश्यक वस्तू पुरविण्यात आल्या.