WB जिंकण्यासाठी 5 डिसेंबरला 1 कोटी घरांपर्यंत पोहाेचणार BJP; लोकांना म्हणणार – ’आर नोय अन्याय’

कोलकाता : वृत्तसंस्था –  2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सर्वांत मोठ्या आउटरीच कार्यक्रमाचा सामना करण्यासाठी भाजपने एक कार्यक्रम बनवला आहे. याद्वारे पक्ष एक कोटीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहाेचणार आहे. यादरम्यान भाजप ममता सरकारचा कथित भ्रष्टाचारसुद्धा उघड करणार आहे.

बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी याबाबत सांगितले की, ममता बॅनर्जी सरकारद्वारे सुरू असलेल्या ’दुआरे सरकार’ कार्यक्रमाप्रमाणे भाजप कार्यकर्तेसुद्धा 5 डिसेंबरला एक कोटीपेक्षा जास्त कुटुंबांपर्यंत पोहाेचणार आहेत. या कार्यक्रमाचे नाव ’आर नोय अन्याय’ (आता आणखी अन्याय नाही) ठेवले आहे. त्यांनी म्हटले की, राज्यभरात भाजप कार्यकर्ते, टीएमसी-सरकारचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी घरांचा दौरा करतील आणि पत्रक वितरित करतील तसेच कशाप्रकारे लोकांना केंद्रीय योजनांपासून वंचित ठेवले जात आहे ते सांगतील.

2021 ची विधानसभा निवडणूक पाहता, ममता बनर्जी सरकारने पुढील दोन महिन्यांत लोकांशी जोडले जाण्यासाठी आपला सर्वांत मोठा आउटरीच कार्यक्रम सुरू केला आहे. 1 डिसेंबर ते 28 जानेवारीच्या दरम्यान राज्याच्या 344 ब्लॉकमध्ये प्रत्येक गावात आणि शहरात किमान चार शिबिरे घेण्यात येतील.

ममता सरकारमधील मंत्री आणि वरिष्ठ टीएमसी नेते सोवनदेब चटर्जी यांनी म्हटले की, आमचा हा कार्यक्रम कोणत्याही राज्य सरकारद्वारे घेण्यात आलेल्या सर्वांत मोठ्या आउटरीच कार्यक्रमांपैकी एक आहे. राज्य सरकारच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी अगोदरच 5.4 लाख लोक दोन दिवसांच्या आत शिबिरात येऊन गेले आहेत. यामुळे भाजप हैराण झाली आहे.

तर, भाजप नेत्याने म्हटले, आर नोय अन्याय चा हा दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा यावर्षीच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता, जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मार्चमध्ये बंगालमध्ये आले होते. 5 डिसेंबरला भाजप कार्यकर्ते संपूर्ण राज्यात एकाच वेळी दुपारी 12 वाजता एक कोटी घरांपर्यंत पोहाेचतील.