चीनी मुलीच मध्यप्रदेशातील युवकावर ‘जीवापाड’ प्रेम, धुमधडाक्यात झालं लग्न

मंदसौर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या एका तरूणाने देशाच्या सीमेपलिकडील चीनमधील तरूणीशी विवाह केला. दोघांनी धर्म आणि देशांची बंधने तोडून आयुष्यभर सोबत राहण्यासाठी एकमेकांचा हात हातात घेतला आहे. मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील या तरूणाने प्रेमाला कोणतीही सीमा नसते, हे खरे ठरवले आहे. चीनी तरूणी जी हाओ आणि मंदसौरचा तरूण सत्यार्थ मिश्रा यांची ही गोष्ट आहे. दोघांची भेट कॅनडामध्ये झाली, नंतर हळुहळु भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी काही काळ डेटिंग केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कुटुंबियांना याबाबत सांगितले.

चीनी तरूणी आणि भारतीय तरूण या दोघांचे आई-वडील सुमारे 3 महीन्यांपूर्वी कॅनडाला गेले आणि त्यांच्या तेथे भेट झाली. या भेटीतील चर्चेनंतर दोघांच्या लग्नाला त्यांनीही संमती दिली. दोन्ही कुटुंबांच्या चर्चेत ठरले की, नवरी मुलगी आपल्या सर्व कुटुंबासह भारतात येईल आणि मंदसौरमध्ये दोघे विवाह बंधनात अडकतील. मागील तीन दिवसात संपूर्ण भारतीय रिती-रिवाजानुसार आणि परंपरांचे पालन करून रविवारी जी हाओ आणि सत्यार्थ यांनी सातफेरे घेतले आणि एकमेकांचे जीवनसाथी झाले. चीनच्या डीजीयोंग शहरात जन्मलेली आणि कॅनडामध्ये राहून शिक्षण घेणारी जी हाओची भेट 5 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशच्या मंदसौरमध्ये राहणार्‍या सत्यार्थ मिश्राशी झाली होती.

एकाच युनिव्हर्सिटीत दोघे शिकले
दोघे कॅनडात एकाच युनिव्हर्सिटीत शिकत होते. येथेच दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम. लग्नासाठी कॅनडाहून जी हाओ आणि चीनच्या डीजीयोंगवरून तिच्या आई-वडीलांसह अन्य 5 नातेवाईक 29 जानेवारीला भारतात दाखल झाले होते. यानंतर हिंदू विवाहात होणार्‍या सर्व विधी करण्यात आल्या आणि रविवारी दोघेही विवाह बंधनात अडकले. लग्नानंतर वर-वधूसह त्यांचे कुटुंबियही खुप आनंदीत झाले आहेत.

चीनमध्ये होणार होते रिसेप्शन
वर सत्यार्थने दिलेल्या माहितीनुसार जी हाओ ही मुळची  चीनची असली तरी मागील अनेक वर्षांपासून ती कॅनडात राहून शिक्षण घेत होती. दोघांनी प्रथम ठरवले होते की, लग्नानंतर नातेवाईक आणि मित्रांसाठी एक रिसेप्शन भारतात द्यायचे आणि एक रिसेप्शन चीनमध्ये द्यायचे. परंतु, चीनमध्ये कोरोना वायरस पसरल्याने चीनमधील रिसेप्शन रद्द करण्यात आले. सत्यार्थने सांगितले, त्याची सासुरवाडी डीजीयोंग शहरात आहे, जेथून कोरोना वायरसने प्रभावित परिसर खुप दूर आहे. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने चीनचे रिसेप्शन रद्द करण्यात आले. आता लग्नानंतर काही दिवस भारतात घालवल्यानंतर दोघे पुन्हा कॅनडाला जाणार आहेत.