Corona Virus : चीनमध्ये आणखी 64 लोकांचा मृत्यू, 425 वर पोहचला मृतांचा आकडा, ‘वुहान’ क्रीडा संकुलचे रुपांतर रुग्णालयात

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीनमध्ये ‘कोरोना’या संसर्गजन्य आजाराचे थैमान वाढतच चालले आहे. मृतांची संख्या चारशे पंचवीस झाली असून तीन हजार दोनशे पंचवीस रुग्ण रुग्णालयात नव्याने दाखल झाले आहेत. हुबेई प्रांतातील वुहानमध्ये या आजाराचा फैलाव झाला. या आजाराने मृत पावलेले आत्तापर्यंतचे सर्व रुग्ण याच प्रांतातील आहेत अशी माहिती चीन च्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

सोमवारी रात्रीपर्यंत देशाच्या मुख्य भागात वीस हजार चारशे अडतीस जणांना या आजाराचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. दोन हजार सातशे अठ्याऐंशी रुग्ण गंभीर आहेत. सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसलेल्या दोन लाख एकवीस हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, चीनमधील होनजोवू हे शहर दक्षतेसाठी सीलबंद केले असून अन्य ठिकाणांहून लोकांना येण्यासाठी तिथे प्रतिबंध करण्यात आला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या चीनमधील वुहान शहरात दहा दिवसांच्या काळात एक हजार बेड्सचे रुग्णालय उभारण्यात आले. संसर्गाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरातील एक क्रीडा संकुल आणि दोन सांस्कृतिक केंद्र ताब्यात घेऊन त्यांचे रुपांतर रुग्णालयात करण्याचे काम सोमवारी रात्री चालू झाले. तीन हजार बेड्सची तिथे व्यवस्था असेल.