कोरोनाच्या सुनामीचा विध्वंस सुरूच, देशात एका दिवसात विक्रमी 3.87 लाख लोक पॉझिटिव्ह, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती मृत्यू?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू आहे. दररोज कोरोना प्रकरणांत वाढ दिसून येत आहे. आता रोजच्या प्रकरणांचा आकडा 4 लाखांच्या जवळ चालला आहे. देशात गुरुवारी एका दिवसात संसर्गाची विक्रमी 386,888 प्रकरणे नोंदली गेली, ज्यानंतर संसर्गाची एकुण प्रकरणे 1,87,54,984 झाली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, उपचाराधीन रूग्णांची संख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे.

मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, गुरुवारी एका दिवसात 3501 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर या घातक आजाराने मृतांची संख्या 2,08,313 झाली आहे. मात्र, बुधवारच्या आकड्यांशी याची तुलना केल्यास थोडा दिलासा मिळत आहे. बुधवारी 24 तासादरम्यान 3647 मृत्यू नोंदले गेले होते, पण आज हा आकडा कमी होऊन 3501 वर आला आहे.

संसर्गाने होणार्‍या मृत्यूदरात घट :
सातत्याने प्रकरणे वाढत असताना देशात उपचाराधीन रूग्णांची संख्या 31,64,825 झालीआहे, जी संसर्गाच्या एकुण प्रकरणांच्या 16.79 टक्के आहे. कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर कमी होऊन 82.10 टक्के झाला आहे. आकड्यांनुसार बरे होणार्‍या एकुण लोकांची संख्या आता 1,53,73,765 झाली आहे. संसर्गाने मृत्यू होण्याचा दर कमी होऊन 1.11 टक्के झाला आहे.

सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात :
मृत्यूच्या नवीन प्रकरणात सर्वाधिक 771 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. यानंतर दिल्लीत 395, छत्तीसगढमध्ये 251, उत्तर प्रदेशात 295, कर्नाटकात 270, गुजरातमध्ये 180, झारखंडमध्ये 145, पंजाबमध्ये 137, राजस्थानमध्ये 158, उत्तराखंडमध्ये 85 आणि मध्य प्रदेशात 95 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत झालेल्या एकुण 2,08,313 मृत्यूंपैकी 67,985 महाराष्ट्रात, 15,772 दिल्लीत, 15,306 कर्नाटकात, 13,933 तमिळनाडूत, 12,238 उत्तर प्रदेशात, 11,248 लोकांचा प. बंगालमध्ये, 8909 जणांचा पंजाबमध्ये आणि 8312 लोकांचा छत्तीसगढमध्ये मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की 70 टक्के पेक्षा जास्त मृत्यू अन्य गंभीर आजारांमुळे झाले आहेत.

आतापर्यंत किती चाचण्या
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार (आयसीएमआर), 28 एप्रिलपर्यंत 28,44,71,979 नमून्याची चाचणी करण्यात आली ज्यापैकी 17,68,190 नमून्यांची बुधवारी चाचणी करण्यात आली.