‘कोरोना’ व्हायरसनं देशातील चिंता वाढवली, संक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या चीनच्या तुलनेत भारतात दुप्पट ‘बाधित’

नवी दिल्ली : लॉकडाऊन – 4.0 संपत आला तरी देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागच्या एक आठवड्यात सुमारे 50 हजार नवीन केसेस समोर आल्या आहेत. शुक्रवारपर्यंत देशात चीनपेक्षा दुप्पट लोकांना लागण झाली आहे. मृत्यूंच्या बाबतीतही भारताने चीनला मागे सोडले आहे.

भारतात लागोपाठ आठ दिवसांपासून 6 हजार नव्या केसेस समोर आल्या आहेत. शुक्रवारी तर विक्रमी 7,466 नवी प्रकरणे समोर आली आणि आकडा 165799 पर्यंत पोहचला. यासोबतच तुर्कीला मागे सोडत भारत त्या पहिल्या नऊ देशांच्या यादीत गेला आहे, जेथे सर्वाधिक लोकांना संसर्ग झाला आहे. प्रमुख आठ देशांत अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनी सहभागी आहे. देशात 14 दिवसात केस दुप्पट होत आहेत, परंतु हाच वेग राहिल्यास पुढील पाच दिवसात दोन लाखांपेक्षा जास्त लोक संसर्गाच्या टप्प्यात असतील.

मुंबई, चेन्नई, पुणे, अहमदाबाद आणि इंदौरसह देशाच्या 15 शहरात 70 टक्केपेक्षा जास्त प्रकरणे आहेत. तर, लखनऊ-कानपुर आणि बेंगळुरु सारख्या शहरात संक्रमण अपेक्षापेक्षा कमी आहे. देशात 24 तासात 175 लोकांचा मृत्यू झाला आणि आतापर्यंत 4706 लोकांनी जीव गमावला आहे. तर चीनमध्ये 4634 लोकांचा मृत्यू झाला आहे. एक आठवड्यापासून देशात कोरोनाने मरणारांचा आकडा सरासरी 160 आहे आणि तो सतत वाढत आहे. थोडी दिलासादायक बाब म्हणजे 71,105 लोक या आजारातून बरे झाले आहेत. देशात रूग्ण बरे होण्याचा दर 42.89 आहे.

राज्याबाबत बोलायचे तर दिल्ली, तमिळनाडुमध्ये संसर्गाचा वेग जास्त आहे. दिल्लीत रोज एक हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. तर, तमिळनाडुत आव्हानात्मक स्थिती आहे, येथे सरासरी 800 पेक्षा जास्त नवीन प्रकरणांची नोंद होत आहे. सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मागील चार दिवसात वेग काहीसा कमी झाला आहे. तर, डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, आपल्याला कोरोनाच्या आणखी एका झटक्यासाठी तयार राहिले पाहिजे. जसजशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता वाढेल, संसर्गाच्या प्रकरणात आणखी एक उसळी दिसून येईल ज्यासाठी आपल्याला तयार रहावे लागेल.