Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 1.15 लाखाहून जास्त ‘कोरोना’च्या टेस्ट, आतापर्यंत 28.34 लाख चाचण्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या बाबतीत दररोज अभूतपूर्व वाढ होत आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाच्या तपासणीची गतीही देशभरात वाढली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआरने शनिवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत देशभरात 1,15,364 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आयसीएमआरनुसार आतापर्यंत देशभरात कोरोना विषाणूचे 28,34,798 नमुने तपासले गेले आहेत.

दरम्यान, शनिवारी देशात कोरोना विषाणूची सर्वात मोठी वाढ दिसून आली आणि गेल्या 24 तासांत 6,654 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे आता संक्रमितांची एकून संख्या 1,25,101 वर पोहोचली आहे. तर या कालावधीत 137 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच मृतांचा आकडा वाढून 3,720 झाला आहे. सलग दुसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या एकूण 69,597 संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत, तर 69,597 लोक बरे झाले आहेत आणि एक रुग्ण देशाबाहेर गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आतापर्यंत जवळपास 41.39 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. परदेशी रुग्ण देखील संसर्ग झालेल्या एकूण 1,25,101 प्रकरणांमध्ये सहभागी आहेत.