Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे कोरेगाव भीमा चौकशी पुढं ढकलली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या दोन सदस्यीय आयोगाने आपे कामकाज कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतरांना आयोगापुढे साक्ष नोंदवण्यासाठी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. 4 एप्रिलला शरद पवार यांना बोलावण्यात आले होते. पण आयोगाने तूर्त आपले कामकाज पुढे ढकलले आहे.

पुणे जिल्हयातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे अनुषंगाने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची पुणे येथील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये सुरु असलेली सुनावणी कामकाज पुढे ढकलण्यात आले आहे, असे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे सचिव व्ही.व्ही. पळणीटकर यांनी कळविले आहे. आयोगाची मुदत 8 एप्रिल रोजी संपणार असल्याने, आयोगाने राज्य शासनास स्टेटस रिपोर्ट पाठवून 6 महिने मुदतवाढ मागितली आहे. मुदतवाद मिळाल्यास आयोगाचा पुढील कार्यक्रम ठरविला जाणार.

1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यामगे नक्की कोणती कारणे होती, याचा शोध घेण्यासाठी दोन सदस्यीय आयोग नेमण्यात आला आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधिश जयनारायण पटेल हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. राज्याचे माजी मुख्य सचिव आणि सध्याचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक हे या आयोगाचे सदस्य आहेत.