भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेत ऑनलाइन होणार ‘सांस्कृतिक’ कार्यक्रम

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेत अनेक सांस्कृतिक आणि संगीतमय कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन करण्यात येणार आहे. जयपुर फुट यूएसएने सांगितले की, 15 ऑगस्टला ते व्हर्च्युअल कवी संमेलनाचे आयोजन करणार आहेत.

संस्थेकडून सांगण्यात आले की, परराष्ट्र राज्यमंत्री आणि संसदीय कार्य मंत्री वी. मुरलीधरन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. परराष्ट्र प्रकरणांच्या संसदीय समितीचे  अध्यक्ष पी. पी. चौधरी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

कार्यक्रमात लोकप्रिय कवी मदन मोहन समर तसेच कुंवर जावेद आपले सादरीकरण करणार आहेत. जयपुर फुट यूएसएचे अध्यक्ष प्रेम भंडारी यांनी म्हटले की, या वर्षी भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खास आहे. कारण पाच ऑगस्टला राम मंदिराचा भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला होता, जो जगभरातील धर्मप्रीय नागरिकांसाठी स्वप्न साकार झाल्याप्रमाणे होता.

सांस्कृतीक संस्था इंडो-अमेरिकन आर्टस कौन्सिलकडून दी फ्रीडम कन्सर्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमात प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान सादरीकरण करतील. न्यूयार्कमध्ये भारताचे महावाणिज्य दूतावास 15 ऑगस्टला ऑनलाइन स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण होणार आहे.