भोपाळमध्ये ‘कोरोना’च्या रूग्णांना होमियोपॅथीच्या उपचारानं बरे करण्याचा दावा, 4 बाधित बरे होऊन घरी गेले

भोपाळ : वृत्त संस्था – भोपाळमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या चार रूग्णांना होमियोपॅथी उपचाराने ठिक करण्यात आले. भोपाळ येथील सरकारी होमियोपॅथी कॉलेज आणि हॉस्पिटलने म्हटले की, कोविड-19 चा संसर्ग झालेले चार रूग्ण त्यांनी 10 दिवसात बरे करून घरी पाठवले आहेत. हॉस्पिटलच्या अधीक्षक डॉक्टर सुनीता तोमर यांनी मंगळवारी सांगितले की, राज्य सरकारने होमियोपॅथी कॉलेजमध्ये कोविड केयर सेंटरची स्थापना केली होती. कमी लक्षणांच्या कोरोना रूग्णांना येथे ठेवण्यात आले होते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

तोमर यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, दहा दिवसांच्या उपचारानंतर दोन मुलांसह सह लोकांना सोमवारी हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली. त्यांनी सांगितले की, चार लोक कोरोनाने ग्रस्त होते. तर दोन त्यांची मुले होती. या मुलांना सुद्धा होमियोपॅथी औषधे देण्यात आली आणि 10 दिवसापर्यंत आई-वडीलांच्या सोबत राहून सुद्धा त्यांच्यामध्ये संसर्गाची लक्षणे आढळली नाहीत. मुलांना कोणतेही अ‍ॅलोपॅथी औषध देण्यात आले नाही. त्यांना केवळ होमियोपॅथी औषध देण्यात आले.

तोमर यांनी सांगितले की, या रूग्णांना भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) निर्देश आणि नियमानुसार दाखल करतेवेळी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा एक वेळचा डोस देण्यात आला आणि त्यांनतर 10 दिवसांच्या काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी होमियोपॅथी औषधे देण्यात आली.

ते म्हणाले, कारण या व्हायरसचा कोणताही उपचार नाही. यासाठी रूग्णांना त्यांच्या लक्षणांवर आधारित होमियोपॅथी औषधे देण्यात आली. यापैकी कोणत्याही रूग्णाची प्रकृती खालावली नाही. कोणत्याही रूग्णाला कुठेही पाठवण्यात आले नाही. कोणत्याही रूग्णाला ऑक्सीजनची गरज भासली नाही.

या रूग्णांवर उपचार करणारे डॉ. मनोज साहू यांनी सांगितले की, या रूग्णांना विशिष्ट लक्षणांच्या आधारावर होमियोपॅथीची औषधे जसे की, स्टॅनम मीट, ब्रायोनिया अल्बा, केम्फोर, आर्सेनिक एल्बमचे डोस देण्यात आले. याचा परिणाम खुप आश्चर्यकारक होता. होमियोपॅथी औषध घेतल्यानंतर रूग्णांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्याचे दिसून आले.