बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेबाबत मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय, शिक्षण मंत्री निशंक म्हणाले…

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी हे स्पष्ट केले की, फेब्रुवारी महिन्यापर्यंत बार्ड परीक्षा होणार नाहीत. शिक्षकांसोबतच्या सवांदादरम्यान त्यांनी म्हटले की, फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्या घेणे शक्य होणार नाही. कोरोना महामारीमुळे यामध्ये उशीर होत आहे. फेब्रुवारीनंतर परीक्षा केव्हा घेतल्या जाऊ शकतात, यावर चर्चा करू. पुढे माहिती दिली जाईल. सातत्याने यावर चर्चा सुरू आहे. एका अन्य प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ऑनलाइन मोडने बोर्ड परीक्षा घेणे शक्य नाही.

निशंक यांनी वेबिनारमधील चर्चेदरम्यान म्हटले की, कोरोना काळात शिक्षकांनी योद्धांप्रमाणे मुलांना शिकवले आहे. ऑनलाइन मोडने मुलांना शिकवण्यात त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. त्यांनी म्हटले की, नवीन शिक्षण धोरणांतर्गत शालेय शिक्षणातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विषय आणत आहोत. भारत जगातील पहिला देश असेल, जिथे शालेय स्तरावरच एआयचे शिक्षण सुरू होईल.

संवादा दरम्यान शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक काय म्हणाले –

– एका शिक्षकाने विचारले – बोर्ड परीक्षांना स्थगिती शक्य आहे का? यामध्ये तीन महिन्यांचा उशीर होऊ शकतो का? यावर उत्तर देताना निशंक म्हणाले की, मोदी सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे. आम्ही सतत विद्यार्थ्यांशी बोलत आहोत. आम्ही कोरोना काळात जेईई मेन आणि नीट सारख्या मोठ्या परीक्षा घेतल्या. बिहार निवडणुकीत या परीक्षांचे उदाहरण घेतले गेले. जानेवारी-फेब्रुवारीत बोर्ड परीक्षा होणार नाहीत. फेब्रुवारीतपर्यंत त्या घेणे शक्य होणार नाही. फेब्रुवारीनंतर परीक्षा केव्हा घेतल्या जातील, यावर चर्चा करू. पुढे माहिती दिली जाईल. सातत्याने चर्चा सुरू आहे.

– नवीन शिक्षण धोरणात इयत्ता 6 पासूनच व्होकेशनल स्ट्रीम येत आहे. इंटर्नशिपच्या सोबत शिक्षण होईल. हे ज्ञान केवळ पुस्तकापर्यंत सीमित नसेल. सर्व माध्यमिक शाळांमध्ये याचा अभ्यास सुरू व्हावा. उद्योग आणि कृषीमध्ये मुलांना शिक्षण मिळावे.

– ज्याप्रकारे शिक्षण धोरणावर शिक्षकांशी चर्चा केली होती, त्याच प्रकारे बोर्ड परीक्षाबाबतही शिक्षकांचे विचार जाणून घ्यायचे आहेत.

अंदाज वर्तवण्यात येत आहे की, शिक्षणमंत्री आज सीबीएसई 10वी 12वी परीक्षा 2021 च्या तारखेची घोषणा सुद्धा करू शकतात. संवाद कार्यक्रमाच्या दरम्यान शिक्षक परीक्षांशी संबंधीत प्रश्न हॅश टॅग #EducationMinisterGoesLive च्या सोबत ट्विटरवर थेट शिक्षणमंत्र्यांना विचारू शकतात.

शिक्षण मंत्र्यांनी मंगळवारी ट्विट केले की, शिक्षक सहकार्‍यांना, मी आज सायंकाळी 4 वाजता आपल्या ट्विटर/फेसबुक पेजवर तुमच्या प्रश्नांना उत्तरे देऊन तुमच्या चिंता दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्याशी संवादाची अपेक्षा करतो.

यापूर्वी निशंक यांनी 10 डिसेंबरला सुद्धा एका वेबिनारद्वारे आगामी बोर्ड परीक्षांच्या मुद्द्यावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती. त्यांनी म्हटले होते की, सीबीएसई 10वी 12वी परीक्षांच्या तारखेबाबत विद्यार्थ्यांनी चिंतीत होण्याची गरज नाही. सीबीएसईची परीक्षा सुरू होण्याच्या खुप अगोदर परीक्षेची तारीख जारी केली जाईल. विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी खुप वेळ मिळेल. सीबीएसईने बोर्ड परीक्षेचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे.