Elon Musk च्या टेस्लाची भारतात ‘एन्ट्री’ ! बेंगळुरूमध्ये केली नोंदणी, आता येथे बनवल्या जातील ‘इलेक्ट्रिक गाड्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अमेरिकेची इलेक्ट्रिक कार बनविणारी एलन मस्कची प्रसिद्ध कंपनी टेस्ला आता भारतात प्रवेश करणार आहे. दिग्गज उद्योगपती एलन मस्क भारतातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी त्यांच्या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीची अधिकृतपणे भारतातील बेंगळुरू येथे नोंदणी झाली आहे.

एक रेग्युलेटरी फाइलिंगनुसार एलन मस्कची कंपनी टेस्लाने आरओसी बेंगळुरू सोबत टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला नोंदणीकृत केले आहे. कंपनीला 1 लाख रुपयांच्या भांडवलासोबत एक अनलिस्टेड प्रायव्हेट संस्था म्हणून नोंदणीकृत करण्यात आले आहे. टेस्ला येथे लक्झरी इलेक्ट्रिक कारचे उत्पादन आणि व्यापार करेल.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (RoC) च्या म्हणण्यानुसार वैभव तनेजा, व्यंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेन्स्टाईन यांना टेस्ला इंडियाचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टेस्लाच्या या निर्णयाचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी स्वागत केले आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते की, टेस्ला 2021 मध्ये भारतात कामकाज सुरू करेल आणि कंपनी भारतात मागणीच्या आधारावर मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापनेची शक्यता जाणून घेईल.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी एका ट्विटर वापरकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून ट्विट केले होते की त्यांची कंपनी 2021 मध्ये भारतीय बाजारात प्रवेश करेल. जेव्हा एका वापरकर्त्याने त्यांच्या कंपनीच्या भारतीय बाजारात प्रवेश करण्याच्या प्रोग्रेसबद्दल प्रश्न विचारला तेव्हा एनल मस्कने सांगितले होते की, टेस्ला पुढच्या वर्षी (2021) भारतात प्रवेश करेल. तथापि, यापूर्वी देखील एलन मस्क यांनी कंपनीच्या भारतात प्रवेशाविषयी दोनदा ट्विट केले आहे.

वर्ष 2019 मध्येही त्यांनी ट्विटरवर वापरकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून पुढल्या वर्षी असे म्हटले होते आणि 2018 मध्ये देखील त्यांनी याच गोष्टीची पुनरावृत्ती केली होती. परंतु यावेळी कंपनीने सन 2021 मध्ये नोंदणी केली आहे.